शुभांगी पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश

SHUBHANGI PATIL

धुळे; पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी अखेर शनिवारी ( दि. ४) शिवसेनेत प्रवेश केला. धनशक्तीविरोधात असलेल्या लढ्यात यंत्रणा राबवण्यात कमी पडल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. यापुढे शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नात लढतच राहणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. पक्ष देईल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडणार असल्याचेही त्‍यांनी या वेळी सांगितले.

नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर आज ( दि. ४ ) त्‍यांनी शिवसेनेत जाहीरपणे प्रवेश केला. मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पाटील यांनी शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले. यावेळी त्यांच्या समवेत ॲड. विवेक सूर्यवंशी यांच्यासह नंदुरबारचे नितीन धनगर, विवेक पाटील, भूषण देवरे यांच्यासह अनेक शिक्षकांची उपस्थिती होती.

या प्रवेशादरम्यान प्रतिक्रिया देत असताना शुभांगी पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी लढत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात महत्त्वाची जबाबदारी देणार असल्याचे संकेत दिले असून, पक्ष देईल ती जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत मोठ्या प्रमाणावर मते बाद झाली. धनशक्ती आणि दडपणामुळे मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या पसंतीची मते मिळाली. पण बाद मतांमुळे मतांचा कोटा हा पूर्ण करण्यात अडचण निर्माण झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. भविष्यात आपण पदवीधर आणि शिक्षकांसाठी लढा सुरूच ठेवणार आहे. या निवडणुकीत शिवसैनिकांनी तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले. त्यांचे परिश्रम कधीही विसरणे शक्य नाही. ही निवडणूक केवळ नाशिक विभागासाठी नव्हती. तर या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका महिला उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील होते, असा आरोप देखील त्यांनी  या वेळी केला.

हेही वाचा : 

The post शुभांगी पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश appeared first on पुढारी.