Site icon

श्वान निर्बीजीकरण मनपाला पडलं महागात, एका श्वानामागे आता ‘इतका’ येणार खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया महापालिकेला भलतीच महागात पडली आहे. अॅनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने काही महिन्यांपूर्वी श्वान निर्बीजीकरणाचा ठेका तडकाफडकी रद्द करण्यात आला होता. त्यानंतर नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेअंती नाशिक रोड व पंचवटी विभागासाठी प्रतिश्वान १६५० रुपये न्यूनतम दराच्या निविदेला स्थायीची मंजुरी घेण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली आहे.

वर्षभरापूर्वी श्वान निर्बीजीकरणाचे दर प्रतिश्वान सरासरी ६५० रुपये होते. आता निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी ठेकेदाराला प्रतिश्वान हजार रुपयांपर्यंत जादा मोजावे लागतील. ही दरवाढ अडीच पटीपर्यंत आहे. सिडको, सातपूर, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम विभागासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न लाभल्याने फेरनिविदा मागविल्या जाणार आहेत.

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या निर्देशांनुसार महापालिकेमार्फत २००७ पासून कंत्राटी तत्त्वावर श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात आहे. गेल्या १६ वर्षांत महापालिकेने एक लाखाहून अधिक भटक्या व मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली आहे. यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रियेद्वारे मक्तेदार निश्चित केला जातो. जुन्याच ठेकेदाराला तब्बल चार वेळा मुदतवाढ दिल्यानंतर गेल्या मे महिन्यात श्वान निर्बीजीकरणासाठी मक्तेदाराची निश्चिती करण्यात आली होती. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात श्वान निर्बीजीकरणासाठी प्रतिशस्त्रक्रिया ६५० रुपये इतका दर अदा केला असताना मे २०२३ मध्ये दिलेल्या ठेक्यासाठी मक्तेदाराला अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचा संदर्भ देत ३५ टक्के वाढ करून प्रतिशस्त्रक्रिया ९९८ रुपये इतका दर मंजूर केला होता. या ठेक्यासाठी मक्तेदाराने कार्यादेश दिल्याच्या सहा महिन्यांच्या आत अॅनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र महापालिकेला सादर करणे बंधनकारक होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे हा ठेका रद्द करण्याचा निर्णय झाला. श्वान निर्बीजीकरणाच्या नवीन ठेक्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. नाशिक रोड व पंचवटी विभागासाठी एक, तर सिडको, सातपूर, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम विभागासाठी स्वतंत्र निविदा मागविल्या गेल्या. यात नाशिक रोड व पंचवटी विभागासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन यांचे प्रतिश्वान शस्त्रक्रियेसाठी १६५० रुपये दर प्राप्त झाले. त्यानुसार २४२४ श्वानांवर शस्त्रक्रियेसाठी ४० लाखांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने गुरुवारी (दि.७) मंजुरी दिली.

दुसऱ्या ठेक्यासाठी फेरनिविदा

अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या निर्देशांनुसार निविदा अटी-शर्ती तयार करण्यात आल्या होत्या. नाशिक रोड व पंचवटी विभागाची निविदा प्रक्रिया अंतिम झाली. मात्र, सिडको, सातपूर, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम विभागासाठी मक्तेदारांचा प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे या विभागांसाठी फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा :

The post श्वान निर्बीजीकरण मनपाला पडलं महागात, एका श्वानामागे आता 'इतका' येणार खर्च appeared first on पुढारी.

Exit mobile version