हिल मॅरेथॉन-2022 : गडावर आज हिल मॅरेथॉनचे सहावे पर्व

हिल मॅरेथॉन - 2022 www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सप्तशृंगगडावर रविवारी (दि. 16) सप्तशृंगी हिल मॅरेथॉन-2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट आणि नाशिक रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे आणि नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी दिली आहे.

सप्तशृंग हिल मॅरेथॉनचे हे सहावे पर्व आहे. आमदार सुधीर तांबे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस अधीक्षक सचिन पाटील, कळवणचे उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांच्यासह राज्यभरातून येणारे स्पर्धक व विविध विभागांचे अधिकारी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. ही मॅरेथॉन स्पर्धा 21, 10 आणि पाच किलोमीटर अशा तीन प्रकारांत स्त्री / पुरुष गटात होणार आहे. यावेळी स्त्री / पुरुषांसाठी स्फूर्ती रन हा विशेष प्रकार असणार आहे. याशिवाय ही मॅरेथॉन ग्रामीण भागात भरविली जाणार असल्याने ग्रामीण खेळाडूंनाही आपले कौशल्य दाखविण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, नाशिक रनर्स, गडावरील तसेच नांदुरी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. मॅरेथॉनच्या निमित्ताने सकाळी 6 ते 9.30 या काळात नांदुरी ते सप्तशृंगगड वाहतूकसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अशी असेल मॅरेथॉन…
गडाच्या पायथ्याशी नांदुरी गावापासून स्पर्धेला प्रारंभ.
21 किमीसाठी नांदुरीगाव ते शिवालय तीर्थ परत नांदुरी गाव मार्ग.
10 किमीसाठी नांदुरी गाव ते मंकी पॉइंट व परत गाव.
हौशी धावपटूंसाठी 5 किमी अंतराचे डिव्हाइन रन.
मॅरेथॉनमध्ये आदिवासी लोकनृत्ये, नाशिक ढोलचे आयोजन.
स्पर्धकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी रुग्णवाहिकेसह डॉक्टरांची टीम कार्यरत.

हेही वाचा:

The post हिल मॅरेथॉन-2022 : गडावर आज हिल मॅरेथॉनचे सहावे पर्व appeared first on पुढारी.