CMA Exam : सीएमए परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांची बाजी

सीएमए,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे संपूर्ण देशभर घेतल्या जाणाऱ्या ‘सीएमए डिसेंबर २०२२’ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात नाशिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य क्षेत्रात सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या सीएमए परीक्षेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

सीएमए (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट) या कोर्सच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षांचे आयोजन हे केंद्र सरकारच्या ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ या संस्थेच्या वतीने केले जाते. १२ वी नंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम फाउंडेशनची ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुढील इंटरमिजिएट परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरतात. इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात. डिसेंबर सत्राची परीक्षा जानेवारीमध्ये अखिल भारतीय स्तरावर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला.

नाशिक विभागाचा निकाल

नाशिक चॅप्टरमधून इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकूण 405 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 23 विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. यात फराज शेख – प्रथम, मंगेश साबळे – द्वितीय, अभिषेक राऊत – तृतीय हे पहिले तीन विद्यार्थी आहेत. तसेच सीएमए फायनलच्या परीक्षेला 142 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अनिल खैरनार, पूजा बोथरा, प्रणित जैन, अंकुर भूषण, चेतन शिंदे हे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए भूषण पागेरे, स्टुडंट डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सीएमए अरिफखान मन्सुरी, प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सीएमए कैलास शिंदे, मीडिया आणि पब्लिक रिलेशनशिप कमिटीचे अध्यक्ष सीएमए निखिल पवार, उपाध्यक्ष सीएमए दीपक जगताप, सचिव सीएमए अर्पिता फेगडे, खजिनदार सीएमए मयूर निकम, सीएमए स्वप्निल खराडे, सीएमए दीपक जोशी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

हेही वाचा :

The post CMA Exam : सीएमए परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांची बाजी appeared first on पुढारी.