Dhule : पिंपळनेरच्या पांंझरा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा:

येथील चिकसे शिवारातील पांझरा नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांसह बाबा फ्रेंड सर्कलच्या तरूणांनी मोठ्या परिश्रमाने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटली असून पिंपळनेर जवळील जामण्यापाडा कुडाशी येथील आदिवासी महिलेचा हा मृतदेह आहे.

याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. काळुबाई टेटीराम शिंदे (३०) रा. जामन्यापाडा, कुडाशी असे या महिलेचे नाव आहे. पांढऱ्या पेशी वाढल्याने तिला पती टेटीराम शिंदे यांनी २१ तारखेला पिंपळनेर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. ते डॉक्टरांकडे औषधाची पावती बनवत असतांना काळुबाई ही दवाखान्यातून निघून गेली. परिसरात शोध घेवूनही ती मिळून आली नाही. माहेरी गेली असावी, असा अंदाज व्यक्त करत पती शिंदेपाडा येथे आले तथेही ती नव्हती. दरम्यान सायंकाळी परत येत असतांना सामोरे, पिंपळनेर रस्त्यावरील अन्नपूर्णा पेट्रोल पंपाजवळ नागरिकांची गर्दी दिसली. पेट्रोल पंपाच्या मागील पांझरा नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह असल्याची चर्चा सुरू होती. माहिती मिळताच घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांसह बाबा फ्रेंड ग्रुपचे महेश वाघ, पप्पू पवार, मुश्रफ शेख, शब्बीर पटेल, आश्रफ पठाण, तेजस राठोड, गौतम पवार, मुशाहीद शेख, आत्तू पटेल, किरण वाघ, अक्षय अहिरे, राकेश पवार, कलीम पटेल हे तरुण दाखल झाले. पांझरा पात्रात महिलेचा मृतदेह दिसला मोठा पूर असल्याने मृतदेह कसा काढावा, असा प्रश्न पोलिसांनाही पडला. मात्र पोलीस व बाबा फ्रेंड ग्रुपच्या तरुणांनी पुरातून मोठ्या कसरतीने मृतदेह बाहेर काढला.

मृतदेहाची ओळख पटली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.  वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश मोहने यांनी तपासणी करून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जामन्यापाडा येथे महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पिंपळनेर पोलिसात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आर.पिंपळे करीत आहेत.

हेही वाचा :

The post Dhule : पिंपळनेरच्या पांंझरा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह appeared first on पुढारी.