
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून बालकांची शिकार करत पिंपळद शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जिवंत जेरबंद करण्यात आले. बिबट्या जेरबंद झाल्याने पिंपळद पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह वनखात्यानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून वनखात्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. या बिबट्याला शार्पशूटरद्वारे गोळ्या घालण्याची तयारीही वनखात्याने केली होती, मात्र सोमवारी (दि. २२) तो जिवंत जेरबंद करण्यास वनकर्मचाऱ्यांच्या धाडसाला यश आले.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे 6 एप्रिलला बिबट्याने देविका सकाळे (५) या चिमुकलीला ठार केले. त्यापूर्वी पंचक्रोशीतील धुमोडी, वेळुंजे, ब्राह्मणवाडे या गावांमध्येही बिबट्याने हल्ले करत बालकांचा बळी घेतला हाेता. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते. महिनाभरापासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नाशिक पश्चिम वनविभागाचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. वनविभागाने विविध भागांत २५ पेक्षा अधिक ठिकाणी पिंजरे व ट्रॅप कॅमरे तैनात केले होते. खुल्या जागेत भक्ष्यदेखील ठेवण्यात आले होते, मात्र हा बिबट्या पिंजऱ्याला चकवा देत होता. त्यामुळे वनपथकांचीही दमछाक होत होती. नागरिकांच्या रेट्यामुळे या बिबट्याला शूट करण्याची परवानगी मागण्याचीही तयारी वनविभागाने केली होती.
सोमवारी संध्याकाळी कोणत्याही परिस्थितीत बिबट्याला जेरबंद करण्याचा अखेरचा प्रयत्न करायचे सकाळीच ठरले आणि सुमारे २५ ते ३० वनाधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक पिंपळदला दाखल झाले. बिबट्याला शोधण्याची माेहीम सुरू केली गेली आणि बिबट्या एका शेतात दबा धरून बसलेला असल्याचे लक्षात येताच वनकर्मचाऱ्यांनी मोठी जाळी त्याच्यावर टाकून त्याला जिवंत जेरबंद केले. त्यास तत्काळ भुलीचे औषध देत बेशुद्ध केले आणि पिंजऱ्यात टाकून सुरक्षितरीत्या रेस्क्यू वाहनातून हलविण्यात आले.
हेही वाचा :
- पुणे डीआरडीओ हनिट्रॅप प्रकरण : सांताक्रुझच्या विश्रामगृहावरही लीला; कुरुलकरचे कारनामे उघड
- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; भाजप-शिंदे गटाच्या प्रत्येकी 7 जणांना संधी मिळणे शक्य
- भिगवण : उजनीची जलसफर अविस्मरणीय, भुरळ पाडणारी
The post Nashik Leopard : बालकांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद appeared first on पुढारी.