World Health Day : आरोग्य विद्यापीठातर्फे जनजागृती रॅली

आरोग्य विद्यापीठ www.pudhari.news

नाशिक :  पुढारी वृत्तसेवा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त समाजात आरोग्याविषयी जागृतता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या प्रारंभी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विशेष अतिथी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. अशोक वानकुंद्रे, माधुरी मुठाळ, डॉ. शिवानंद तोंडे, डॉ. बाळासाहेब घुले, बाळू पेंढारकर, डॉ. बालाजी अलमले, डॉ. स्वानंद शुक्ला उपस्थित होते.

विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्यानुसार ’आरोग्य सर्वांसाठी’ या थीमचा सर्वांनी अंगीकार केला पाहिजे. उत्तम आरोग्य असणे आवश्यक आहे. यासाठी सकस आहार, व्यायाम, योगासने व ध्यानधारणा करणे गरजेचे आहे. आरोग्य विषयक जनजागृती करतांना अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. याचे महत्व समाजाला पटवून देणे आवश्यक आहे. जनजागृती रॅलीच्या माध्यमातून आरोग्य विषयक संदेश सर्वांपर्यंत पोहचवा आणि उत्तम आरोग्यासाठी करावयाच्या चांगल्या सवयींची स्वतःपासून सुरवात करण्याचे आवाहन त्यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ यांनी सांगितले की, आरोग्य विषयक जनजागृती रॅलीत दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग आणि जनजागृतीसाठी असणारी तळमळ वाखाणण्याजोगी आहे. शिक्षक, विद्यार्थी व स्वयंसेवकांनी समाजातील लोकांना आरोग्य विषयक माहिती देऊन प्रबोधन करावे. आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी समाजात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांनी सांगितले की, यावर्षांच्या आरोग्य दिनाच्या थीमनुसार व शासनाने निर्देशित केल्यानुसार अवयवदानासाठी विशेष जागृती होणे गरजेचे आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. अवयवदानाविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत त्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. पथनाटय व जनजागृतीच्या माध्यमातून विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी घेतलेला सहभाग व कृती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आरोग्य विषयक जनजागृती करण्याचे विविध उपक्रम विद्यापीठातर्फे राबविण्यात येत आहेत. नाशिक येथे हुतात्मा अनंत कान्हेेरे मैदान येथून सकाळी भव्य रॅलीचा मान्यवरांच्या हस्ते ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात आला. तसेच राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर येथेही जनजागृती रॅली काढण्यात आली. आयोजित जनजागृती रॅलीमध्ये डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद सेवा संघ महाविद्यालय, पंचवटी,  सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय, मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालय, धन्वंतरी होमिओपॅथी महाविद्यालय, गोखले नर्सिंग महाविद्यालय, गणपतराव आडके नर्सिंग महाविद्यालय, प्रवरा नर्सिंग महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय, भौतिकोपचार महाविद्यालय आदी संलग्नीत महाविद्यालयातील  विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. डॉ. कविता मातेरे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बाळू पेंढारकर यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी आरोग्य विषयक जनजागृतीसाठी विविध विषयांवर पथनाटयाचे सादरीकरण केले. जनजागृती रॅलीकरीता विद्यापीठाचे आबाजी शिंदे, विनायक ढोले, निकेश बागुल यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:

The post World Health Day : आरोग्य विद्यापीठातर्फे जनजागृती रॅली appeared first on पुढारी.