अरे बाप रे ! ग्रामसेवकानेच लांबवली 50 हजारांची रोकड ठेवलेली पिशवी

चोरी www.pudhari.news

जळगाव : अमळनेर शहरातील कचेरी समोर दुचाकीला लावलेली ५० हजार रूपये ठेवलेल्या रोकडची पिशवी आणि महत्वाची कागदपत्रे ग्रामसेवक जितेंद्र पाटील यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील विजय कैलास पाटील (वय २९) हे बांधकाम ठेकेदारीचा व्यवसाय करतात. ११ मार्च रोजी विजय पाटील हे अमळनेर शहरातील कचेरी समोर दुचाकी क्रमांक एमएच १९ एएच ८५२९ ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकीच्या हॅन्डलला ५० हजार रूपये आणि महत्वाची कागदपत्रे ठेवलेली पिशवी लटकवलेली होती. त्यावेळी नगाव येथील ग्रामसेवक जितेंद्र विनायक पाटील यांनी पिशवी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चौकशी अंती अखेर दि. २० मार्च रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विजय कैलास पाटील दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी ग्रामसेवक जितेद्र पाटील याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.

The post अरे बाप रे ! ग्रामसेवकानेच लांबवली 50 हजारांची रोकड ठेवलेली पिशवी appeared first on पुढारी.