नाशिक; पुढारी वृत्तसेवा : आधी तुम्ही नीट उभे राहा. मला निवडणुकीचे सांगू नका. तुम्ही साधी ग्रामपंचायत निवडणूक लढून दाखवा, असे प्रतिआव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिले आहे. ओबीसीतून आरक्षण घेण्याचा विषय त्यांनी बंद करावा. आम्ही त्यांचे उपकार मानू, असे विधानही भुजबळ यांनी केले आहे.
जरांगे आमच्यात फूट पाडत आहेत. कधी म्हणतात, धनगरांच्या बाजूने लढणार, तर कधी म्हणतात नाभिक समाजाच्या बाजूने लढणार आहे. तुम्ही तर आमच्या नाभिक आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचे काम करत आहात. ते थांबवा आधी. खूप उपकार होतील आमच्या सर्वांवर, असे भुजबळ म्हणाले.
जरांगेंना सांगा, आधी ग्रामपंचायतीला उभे राहून दाखवा. भुजबळ ग्रामपंचायत नव्हे तर, मुंबईच्या महानगरपालिकेत 25 वर्षे निवडून येऊन दोनदा महापौर झाले. त्यानंतर आमदार आणि मंत्रीही झाले. मी कुठली निवडणूक लढवावी हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाही, असेही भुजबळ म्हणाले.
ओबीसी आरक्षणावर आक्रमण होत असून काहींना मागील दाराने आरक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. आम्ही जिथे मेळावे घेतो त्या ठिकाणी सर्वच समाजाचे लोक असतात. आरक्षण वाचवण्यासाठी अनेक लोक आमच्यासोबत येत आहेत. अशावेळी आम्ही नवीन पक्षाचा विचार केला तर ही मंडळी काय करणार? त्यामुळे कदाचित आमच्यात दोन मतप्रवाह असू शकतात. आता जे ओबीसी एकत्र येत आहेत, त्यात खंड पडायला नको, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
The post आधी नीट उभे राहून दाखवा; भुजबळ यांचा जरांगेंवर पलटवार appeared first on पुढारी.