नववर्षात माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

शाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्यातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने शाळांना पत्र काढत या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात सन २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत ४७८ शाळांचा समावेश असलेला योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित आहे. ही योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येते.

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेस पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाकरिता अनुक्रमे २१ लाख, ११ लाख व ७ लाख रुपये इतक्या रकमेचे पारितोषिक देण्यात येतील. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर शाळांना अनुज्ञेय असेल. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असतील, तर प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण विभागाचे प्राचार्य हे सदस्य आहेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी अध्यक्ष असतील तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व गटशिक्षणाधिकारी सदस्य असतील. या योजनेत सहभागी होण्यासाठी शाळांना आवाहन करण्यात आले आहे.

१ जानेवारीपासून अभियानास सुरुवात

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून हे अभियान सुरू होणार आहे. पुढील ४५ दिवस म्हणजेच १५ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालणार आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन या ४५ दिवसांत करणे आवश्यक राहील.

शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक, आनंददायी वातावरणाची निर्मिती हे उद्देश या अभियानाचे आहेत. जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना आहे.

– नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक)

हेही वाचा :

The post नववर्षात माझी शाळा, सुंदर शाळा अभियान appeared first on पुढारी.