मतदान केंद्रांवर महापालिका पुरविणार वैद्यकीय सुविधा

रुग्णवाहिका,

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मे महिन्यातील कडक उन्हाचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार महापालिकेने २० मे रोजी शहरातील सर्व २०५ शाळांमधील मतदान केंद्रांवर तसेच ४ जून रोजी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा पुरविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची मदत घेतली जाणार आहे.

यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस आएमए (इंडीयन मेडीकल असो.), निमा (नॅशनल इंटीग्रेटेड मेडीकल असो), पीएमए (प्रायव्हेट मेडीकल असो), एफपीए (फॅमीली प्रॅक्टिशनर असो), एसएडीए (सातपूर अंबड डॉक्टर असो), जीपीए(जनरल प्रॅक्टिशनर असो.) या संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा लागणार असल्यामुळे शहरातील रुग्णालयांनी तसेच खासगी डॉक्टरांनी वैद्यकीय विभागाला सेवा देण्याचे आवाहन डॉ.चव्हाण यांनी केले. सीएसआर अंतर्गत मोठ्या रुग्णालयांनी वैद्यकीय सुविधा दिल्यास, मतदानाची प्रक्रिया सुकर होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यावर डॉ.सुधीर संकलेचा, डॉ.सचिन देवरे, डॉ. सुजीत सुराणा यांनी यावेळी वैद्यकीय विभागाला आवश्यक ते खासगी डॉक्टर, स्टाफ, रुग्णवाहिका, व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. वैद्यकीय विभागाच्या आवाहनानंतर ६४ व्हीलचेअर उपलब्ध झाले आहेत. खासगी रुग्णालयांकडून २५ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

अशी असेल वैद्यकीय सुविधा

नाशिक लोकसभा मतदारसंघात २०५ शाळा इमारतीत १२६७ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अंपग तसेच जेष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, तापमानामुळे मतदारांना चक्कर आल्यास किंवा उन्हाचा त्रास झाल्यास त्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि डॉक्टर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच उष्माघातामुळे मतदारांना किंवा मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही त्रास झाल्यास, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. त्यामुळे शहरातील बड्या रुग्णालयांमध्ये या दिवशी अशा रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याचे निर्देश आहेत.

हेही वाचा –