मखमलाबादला आढळला मृत बिबट्या

नाशिक मखमलाबाद : पुढारी वृत्तसेवा- येथील शाळेच्या पाठीमागील महाले मळा भागातील शेतात नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचे साम्राज्य असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मंगळवारी (दि. २६) सकाळी आठ वाजेच्या सुमारास नागरिकांच्या निदर्शनास बिबट्या पडला. तो झोपला आहे की बसला आहे, याचा अंदाज येत नव्हता. बराच काळ बिबट्याची कोणतीही हालचाल होत नसल्याने दूरवर उभे राहून निहाळणाऱ्या नागरिकांनी अखेर जवळ जावून पाहण्याचा प्रयत्न केला. तत्काळ म्हसरुळ पोलिसांना खबर देण्यात आली.

वन विभागालाही माहिती देण्यात आल्याप्रमाणे पोलिस व वनकर्मचारी गोळीबार चौकापुढील महाले मळ्यात दाखल झाले. खात्री केली असता बिबट्या मृत निष्पन्न झाला. त्याचा मृत्यू कशामुळे झाला हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पंचनामा होऊन बिबट्या वनविभागाने तपासणी हालविला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतरच बिबट्याच्या मृत्यूचे गुढ उकलणार आहे.

नागरी सुरक्षेचा प्रश्न

महाले मळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याठिकाणी पिंजरा लावून बिबट्यांना सुरक्षित अधिवासात सोडण्यात यावे, अशी स्थानिकांनी मागणी केली आहे. गांधारवाडी परिसरात देखील बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाने नागरी सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गांधारवाडी व मखमलाबाद भागातील नागरिकांनी मागणी केली आहे.

दोन ते तीन वर्षापासून या परिसरात नर मादी तसेच त्यांच्या बछड्यांचा वावर दिसून येत आहे. आमच्या मळ्यातील चार ते पाच कुत्र्यांचा फडश्या बिबट्याने पाडलेला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या ठिकाणी फिरणे सुद्धा मुश्किल झाले आहे. – नारायण काकड, स्थानिक शेतकरी

हेही वाचा :

The post मखमलाबादला आढळला मृत बिबट्या appeared first on पुढारी.