उंटवाडी येथे दोन दिवसीय अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा

म्हसोबा यात्रा pudhari.news

 २०आणि २१ एप्रिल रोजी आयोजन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षी प्रमाणे यंदाही उंटवाडी येथील अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा शनिवार दि.२० आणि रविवार, दि. २१ एप्रिल दोन दिवसीय यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त दि.२१ एप्रिल रोजी कुस्त्यांची दंगल होणार असल्याची माहिती अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा कमेटीचे अध्यक्ष फकिरराव तिडके यांनी दिली.

म्हसोबा महाराज यात्रा कमेटीची बैठक नुकतीच म्हसोबा महाराज मंदिरात फकिरराव तिडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीप्रसंगी अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्राेत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सिटी सेंटर मॉल नजीक महाकाय आणि विशाल वटवृक्षाच्या छायेखाली अतिप्राचीन म्हसोबा महाराज मंदिर आहे. या मंदिराच्या माध्यमातून पूर्वापार चालत असलेली यात्रेची परंपरा आजतागायत जोपासली जात आहे. या ठिकाणी होणाऱ्या यात्रेमध्ये उंटवाडीसह मोरवाडी, अंबड, पाथर्डी, वडनेर, सातपूर, पिंपळगाव खांब, गौळाणे, दाढेगाव आदी भागातून पूर्वीच्या काळात बैलगाडीतून भाविक यात्रेसाठी येत होते. मात्र काळानुसार बदल झाला असला तरी यात्रोत्सव पूर्वीसारखाच आजही कायम असून सर्वश्रृत असलेल्या अतिप्राचीन म्हसोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त दिनांक २० एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता पंच कमेटीच्या हस्ते श्रीं चे अभ्यंगस्नान आणि दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. तसेच सकाळी ९ वाजता महापुजन आणि तळी भरणे तर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.  सकाळी १० वाजेपासून होमियोपॅथी तज्ज्ञ डॉ चारुशिला गवळी नाईक आयोजीत मोफत सर्व रोग निदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दिनांक २१ रोजी दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार असून या म्हसोबा यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा कमेटीचे माजी अध्यक्ष मधुकर तिडके यांच्यासह सदाशिव नाईक, अंबादास जगताप, रामचंद्र तिडके, माजी नगरसेवक आण्णा पाटील, दत्ता पाटील ,बाजीराव तिडके, विलास जगताप, दिनकर तिडके, विष्णु जगताप, एकनाथ तिडके, जगन्नाथ तिडके, राजेश गाढवे, सुरेश जगताप, बाळासाहेब तिडके, संतोष कोठावळे, प्रविण जगताप, दत्तात्रेय तिडके, ॲड. संदीप फडतारे आदींसह म्हसोबा महाराज यात्रा पंच कमेटीने केले आहे .

हेही वाचा:

The post उंटवाडी येथे दोन दिवसीय अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा appeared first on पुढारी.