उद्योगांना वीज दरवाढीचा ‘शॉक’

सतीश डोंगरे

नाशिक : महावितरणने एक एप्रिलपासून वीज दरवाढ केल्याने सर्वसामान्यांसह उद्योग क्षेत्राला दरवाढीचा मोठा ‘शॉक’ बसला आहे. गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या शेजारील राज्यांमध्ये विजेचे दर तुलनेत कमी असताना महाराष्ट्रात मात्र सातत्याने महावितरणकडून दरवाढ केली जात आहे. अगोदरच कोरोना, जागतिक मंदीच्या विळख्यात उद्योग क्षेत्र सापडले असताना वीज दरवाढ या क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारी ठरत आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज बिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ केली आहे. स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ केली आहे. दर वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार असून त्याचा थेट परिणाम नफ्यावर होणार आहे.

महाराष्ट्रातील विजेची स्थिती

यापूर्वी ग्राहकांना 1 ते 100 युनिटसाठी 5 रुपये 58 पैसे प्रतियुनिट दराने बिल भरावे लागायचे. आता त्यांना प्रतियुनिट 5 रुपये 88 पैसे या दराने मोजावे लागतील. नव्या वाढीनुसार 101 ते 300 युनिटसाठी 11 रुपये 46 पैसे, तर 301 ते 500 युनिटसाठी 15 रुपये 72 पैसे आणि 500 हून अधिक युनिटसाठी प्रतियुनिट 17 रुपये 81 पैसे मोजावे लागत आहेत. स्थिर आकारात पूर्वीच्या तुलनेत 10 ते 20 टक्के दरवाढ झालेली आहे.

शेजारील राज्यातील विजेचे सरासरी दर

गोवा ः 3.05 रुपये प्रतियुनिट
कर्नाटक ः 6.10 रुपये प्रतियुनिट
मध्य प्रदेश ः 5.47 रुपये प्रतियुनिट
तामिळनाडू ः 6.90 रुपये प्रतियुनिट
उत्तर प्रदेश ः 6.50 रुपये प्रतियुनिट
(यातील कर्नाटकसह अन्य राज्यांतही औद्योगिक वापरासाठीच्या विजेवर क्रॉस सबसिडी दिली जाते.)

महाराष्ट्रात मूलभूत सेवा सुविधा असल्याने उद्योगपूरक वातावरण आहे. गुंतवणुकीच्या द़ृष्टिकोनातून अनेकांची पहिली पसंती महाराष्ट्राला आहे; परंतु येथील विजेचे आणि भूखंडांचे अवास्तव दर यात आपण मागे पडत आहोत. किमान येणार्‍या नवीन गुंतवणुकीसाठी शेजारील राज्यांच्या तुलनेत दर कमी आकारावेत.
– धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा