जळगाव :अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भडगावात संतप्त नागरिकांचा मूक मोर्चा

भडगाव मूक मोर्चा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: भडगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमाला कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी आज (दि.४) सकल मराठा समाजासह अन्य समविचारी संघटनांच्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पीडित मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला, आणि प्रकरणी  चांगला वकील दिला जाईल, संशयित आरोपीला कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन दिले.

गोंडगावातील गरीब कुटुंबाने त्यांची मुलगी गमावली असून त्यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभी राहण्याची गरज असल्याची संवेदना व्यक्त करीत सकल मराठा समाज, तसेच सर्वपक्षीय संघटनांनी एकत्र येत भडगाव नगरपरिषद कार्यालयापासून तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, विकृत बुद्धी अमानुषपणे कृत्य करणाऱ्या नराधमाला फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्यात यावा, सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम, यांची नियुक्ती करून या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देण्यात आले.

आज भडगाव तालुका बंद

यानंतर चिमुकलीला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत हत्या केल्याच्या निषेधार्थ शनिवार ५ रोजी भडगाव शहर तसेच तालुका एक दिवस बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शहरातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थीनी,महिला मंडळ, यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, पाचोरा तालुका उपाध्यक्ष ललिता पाटील, उबाठा गटाच्या वैशाली सूर्यवंशी, माजी आ.दिलीप वाघ, सचिन सोमंवशी, वैशाली पाटील, योजना पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

….मुख्यमंञ्याचे कठोर कारवाईचे आश्वासन

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, भडगाव तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाप्रसंगी या पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलव्दारे संवाद साधून पीडीत परिवाराचे सांत्वन केले. तसेच या चिमुकलीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

 

The post जळगाव :अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भडगावात संतप्त नागरिकांचा मूक मोर्चा appeared first on पुढारी.