Nashik : मुळेगावला मिळणार वालदेवी धरणातून पाणी

वालदेवी धरण ,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगावला अडीच किलोमीटर अंतरावरील वालदेवी धरणातून पाणीपुरवठा शक्य असताना देखील ठेकेदाराने सहा किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील अंजनेरी लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाइपलाइन टाकण्याचा घाट घातला होता. परंतु अंजनेरीच्या जय हनुमान पाणीवाटप संस्थेने आक्षेप घेत न्यायालयात याचिकेच्या माध्यमातून ठेकेदाराचा डाव उधळून लावल्याने मुळेगावला थेट वालदेवीसारख्या मोठ्या धरणातून अधिक दाबाने पाणीपुरवठा शक्य होणार आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथे पाण्यासाठी अडीच किलोमीटर अंतरावरून वालदेवी धरणाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होते. तरीदेखील सहा किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील अंजनेरी लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाइपलाइन टाकण्याचा प्रकार संबंधित ठेकेदाराने चालविला होता. या प्रकाराला जय हनुमान पाणीवाटप संस्थेने आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्याबाबत थेट जिल्हा परिषदेला चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले. चौकशी समितीच्या अहवालात तथ्य आढळले. त्यामुळे मुळेगाववासीयांना आता थेट वालदेवीसारख्या मोठ्या धरणातून अधिक दाबाने पाणीपुरवठा शक्य होणार आहे. तब्बल चार किलोमीटर पाइपलाइनचा अनाठायी खर्च वाचणार आहे.

अंजनेरीच्या लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाणी वाटपाचे नियोजन पाहणाऱ्या जय हनुमान सहकारी पाणीवाटप संस्थेने त्यांच्या धरणातून अनाठायी अन्यत्र केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजनेला उधळून लावले. त्यासाठी संश्थेचे अध्यक्ष निवृत्ती चव्हाण आणि सहकाऱ्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली. मुळेगावच्या पाण्यासाठी वालदेवी धरण अवघ्या अ़़डीच किलोमीटर अंतरावर आहे. ते धरण अंजनेरी ल. पा. प्रकल्प या सहा किलोमीटरवरील साठ्याच्या तुलनेत दसपट मोठे आहे. तसेच मुळेगाव ते वालदेवी धरण ही जागा सपाट आहे, तर मुळेगाव ते अंजनेरी दरम्यान डोंगराळ भाग असूनही अंजनेरी ल.पा. प्रकल्पातूनच पाइपलाइनचा टाकण्याचा डाव जय हनुमान पाणीवाटप संस्थेच्या सजगतेमुळे आणि त्यांनी लढलेल्या न्यायालयीन लढाईमुळे असफल ठरला.

हेही वाचा : 

The post Nashik : मुळेगावला मिळणार वालदेवी धरणातून पाणी appeared first on पुढारी.