जळगाव: खडकी येथील वसतीगृहात मुलींसह अल्पवयीन मुलावरही लैंगिक अत्याचार

मुलावर अत्याचार,www.pudhari.news

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : एरंडोल तालुक्यातील खडकी गावात मुलींच्या वसतीगृहातील ५ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण काळजी वाहकानेच केल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत काळजीवाहक तसेच त्याची पत्नी (वसतीगृहाच्या अधीक्षका) आणि सचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आता आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. वसतिगृहाचा काळजीवाहक गणेश पंडित याने अल्पवयीन मुलावरही अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलाने दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

पीडित मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याने होळीच्या दिवशी पाणी भरण्यास नकार दिल्यामुळे संशयित आरोपी गणेश पंडित याच्या सांगण्यावरून वस्तीगृहातील आठ- दहा मुलांनी या बालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच एका रविवारच्या दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तो वॉशरूमला गेला असता, गणेश याने त्याच्यावर शारीरिक व लैंगिक अत्याचार केले. तसेच सदर घटना मुलाने संस्थेचे अध्यक्ष व संबंधितांना सांगितले असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ दादाजी यशवंत पाटील (वय ६०), सचिन प्रभाकर पाटील (वय ३०), भूषण प्रभाकर पाटील (वय २८), गणेश शिवाजी पंडित (वय २९) यांच्यासह वसतिगृहातील आठ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची महिला बालकल्याण समितीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशी दरम्यान हा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे.

संस्थाध्यक्षासह दोघे फरारी

संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र सचिन पाटील व भूषण पाटील फरारी झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. गुन्ह्यातील सर्व अल्पवयीन मुलांना जळगाव येथील मुलांच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे.\

हेही वाचा 

The post जळगाव: खडकी येथील वसतीगृहात मुलींसह अल्पवयीन मुलावरही लैंगिक अत्याचार appeared first on पुढारी.