जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी पैशांची मागणी, कैद्याचा आरोप

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोपी कक्षात (प्रिझन वॉर्ड) उपचारासाठी दाखल करण्यासाठी ६० ते ७० हजार रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप एका कैद्याने केला आहे. तसेच त्याने कारागृहातील भिंतीवर डोके आपटून डोक्यास दुखापत करून घेतली. त्यामुळे कैद्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरिश्चंद्र काशीनाथ भंडारी (रा. इगतपुरी) असे कैद्याचे नाव आहे. त्याच्या दाव्यामुळे खळबळ उडाली असून, त्याच्या नातलगाने जिल्हा व सत्र न्यायालयात यासंदर्भात अर्ज केल्याचे समजते.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून मंगळवारी (दि. २८) खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हरिश्चंद्र भंडारी यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याने आरडाओरड करून कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात आरोप केले. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यासाठी साठ ते सत्तर हजार रुपयांची मागणी डॉक्टर करतात. पैसे नसले तर उपचारासाठी पाठवले जात नाही. तसेच अर्वाच्च भाषेत कैद्यांसोबत बोलले जाते, असा आरोप भंडारी यांनी केला आहे.

कारागृहातून वेळोवेळी मागणी करूनही जिल्हा रुग्णालयात दाखल केले नाही. कारागृहातील पोलिसांनीही पैसे मागितले. त्यामुळे डोके भिंतीवर आदळल्याचा दावा हरिश्चंद्रने केला. यासह त्याच्या नातलगाने लेखी अर्ज करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्याचे समजते. दरम्यान, हा प्रकार समजताच सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत चौकशी केली. संशयिताच्या यकृताला सूज असून नाकाचे हाड वाढल्याने वेदना होत आहे. सध्या प्रिझन वॉर्डमध्ये एकच कैदी उपचार घेत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस तपास करीत आहेत.