जिल्ह्यात धार्मिक शिबिरे, मेळाव्यांवर निर्बंध- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हाधिकारी जलज शर्मा,www.pudhari,news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात लोकसभा निवडणूक शांततेत व निर्विघ्न पार पाडण्याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरे व मेळावे आयोजनावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. ६ जूनपर्यंत लागू असतील.

गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हा प्रशासनापुढे निवडणुका शांततामय वातावरणात पार पाडताना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा यांनी काही प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. त्यामध्ये आचारसंहिता काळात जात, भाषा, धर्माशी संबंधित शिबिरे तसेच मेळाव्यांचे आयोजन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई केली जाणार आहे. तसेच राजकीय पक्ष, उमेदवार तसेच कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेने आचारसंहितेचे कोटेकोर पालन करावे, अशा सूचनादेखील प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

प्रथम परवानगी गरजेची

निवडणूक काळात राजकीय पक्ष, पक्षाशी संबंधित व्यक्ती, संस्थांकडून होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतींवर जाहिराती लावून शहराचे विद्रूपीकरण केले जाऊ शकते. हीच शक्यता गृहीत धरून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मालमत्ता विद्रूपीकरणावरही प्रतिबंध करण्यात आला आहे. मालमत्तांवर होर्डिंग्ज, बॅनर्स लावण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

असे आहेत प्रतिबंधात्मक आदेश

-जात, भाषा, धार्मिक शिबिरांवर ६ जूनपर्यंत बंदी

-प्रचारासाठीच्या वाहनांवर पक्षाचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूला असणे बंधनकारक

-गाडीच्या टपापासून झेंडा दोन फुटांपेक्षा अधिक उंच जाऊ नये

-प्रचारासाठी परवानगी घेतलेल्या वाहनावरच पक्षाचा झेंडा लावता येणार

-धरणे आंदोलने, मोर्चा, निदर्शने, उपोषणांवर बंदी

-धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये निवडणूक प्रचार कार्यालय स्थापण्यास बंदी

– निवडणुकीच्या प्रचार साहित्यावर मुद्रक, प्रकाशकांची नावे आवश्‍यक

– रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत ध्वनिक्षेपकाच्या वापरावर बंदी

– एकाच ठिकाणी भोंगा लावण्याची परवानगी

– सरकारी, निमसरकारी कार्यालयांत सभा घेण्यास बंदी

– घातक शस्त्रास्त्रे जवळ बाळगण्यास बंदी

हेही वाचा-

The post जिल्ह्यात धार्मिक शिबिरे, मेळाव्यांवर निर्बंध- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.