धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शत्रूला नामोहरण करणारी युध्दनिती, कुशल प्रशासक आणि राजा कसा असावा याचा आदर्श ज्यांनी संपूर्ण जगाला घालून दिला, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जयजयकार सातासमुद्रापार घुमला. अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयी अस्मिता जागविण्याचे काम मराठी माणसांनी केले आहे. अमेरिकेत साजर्‍या झालेल्या शिवजयंतीची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून आयोजकांचे आभार मानले आहेत.

मराठी माणूस जगात कुठेही असला तरी मातृभाषा, जन्मभूमी आणि आराध्य दैवतांवरील प्रेम कधीही विसरत नाही. त्याच अनुषंगाने अमेरिकेतील रिचमंड, व्हर्जिनिया येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे पहिल्यांदाच भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. अमेरिकेत स्थायिक झालेल्या नवीन पिढीला आणि पाश्‍चिमात्य देशांना महाराष्ट्रातील महापुरुषांच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख व्हावी, म्हणून शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार रिचमंड (अमेरिका) तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले. रिचमंडमधील हिंदू सेंटर ऑफ व्हर्जिनीया येथे जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राची लोककला, पोवाडा, लेझीम तसेच छत्रपती शिवाजी महाराजावरील व्याख्याने यांच्यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. रिचमंड मराठी शाळेतील मुलांनी पोवाडेही कार्यक्रमात सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजक विनोद सुर्यवंशी, सुचिता सुर्यवंशी, मनिषा कोरडे, अमित कोरडे, श्रीप्रसाद कदम, दिपा कदम, भूषण आपटे, भरत सुर्यवंशी, सुप्रिया सुर्यवंशी बकुल आपटे, निलेश भंडारे, पुरु ठाकरे, केदार पाटणकर, संजय मुळे, अक्षय भोगे, गौतम पुराणिक, अनिल डेरे, प्रसाद वझे, किरण पाटील, अमोल पाटील, अमित पवार, सुलभा ठुबे, अपर्णा पाटील यांच्यासह ग्रेटर रिचमंड मराठी मंडळाने सहकार्य केले. यावेळी रिचमंड (अमेरिका) येथील दिडशेहून अधिक मराठी व आंतरराष्ट्रीय प्रेक्षक उत्साहात सहभागी झाले होते.

हेही वाचा:

The post धुळे : अमेरीकेतही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार appeared first on पुढारी.