
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किना-याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव शंकर येथे काही काळ वास्तव्यास होते. जगभरात असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा शिवपिंडीसमोर असतोच. नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात महादेवाच्या पिडींसमोर नंदीच नाही, कारण याठिकाणी महादेवाने नंदिला आपले गुरु मानले आहे. मग, नेमकं असं काय झालं की या ठिकाणी महादेवाने नंदिला आपलं गुरु मानलं आहे. चला तर जाणून घेऊया या मागची आख्यायिका….
अशी आहे या मागची आख्यायिका…
एकदा इंद्र सभा भरली होती. त्या सभेला सर्व देव उपस्थित होते. त्यावेळी ब्रम्हदेव व शिवशंकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असलेल्या ब्रम्हदेवाची चार तोंडे वेध म्हणत तर एक तोंड निंदा करत असे. संतापलेल्या महादेवांनी ब्रम्हदेवाचे पाचवे तोंड (निंदणारे) तोंड उडविले. ते तोंड शिवशंकर यांच्या हाताला चिटकून बसले. त्यामुळे शिवशंकरास ब्रम्हहत्येचे पातक लागले. त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्वताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईना… या पातकापासून आपली कशी सुटका करुन घ्यावी याची चिंता महादेवांना सतावत होती.
ब्रम्हहत्येच्या दोषापासून मुक्ती कशी मिळवायची या चिंतेत असलेल्या महादेवांची हीच समस्या अखेर नंदीने सोडविली. अशातच नंदीनं महादेवांना नाशिकच्या रामकुंडावर आणले. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं ब्रम्हहत्येचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय. अशी आख्यायिका आहे.
रामकुंडात विसावला नंदी
कपालेश्वर मंदिराच्या समोरच काही अंतरावर गोदावरी नदी वाहते. या नदीतच म्हणजेच रामकुंडात हा नंदी विसावलेला आहे. यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार बारा ज्योतिर्लिंगानंतर नाशिकमधील कपालेश्वर मंदिराचे महत्व आहे. महादेवाचं हे असं मंदिर आहे, जिथे नंदीच नाही. एका कपालेश्वर मंदिराच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळत असल्याचा पौराणिक संदर्भही सापडतो.
महाशिवरात्रीला होते मोठी गर्दी
आजच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. सकाळपासून भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला जातो. पूजाविधी केले जातात. याशिवाय कपालेश्वर मंदिरात दर सोमवारी व श्रावणी सोमवारी भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात.
हेही वाचा :
- Shiv Jayanti : हजारो शिवप्रेमी शिवजयंतीसाठी आज आग्र्याकडे रवाना होणार
- लंडननंतर सर्वाधिक ट्रॅफिक जाम बंगळूरमध्ये; पुणे सहाव्या, मुंबई ४७, तर दिल्ली ३४ व्या स्थानी
- पुणे : काँग्रेस शेवटचे दोन दिवस ‘महात्मा गांधीं’ना आणणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
The post नाशिकचं कपालेश्वर मंदिर, जिथे महादेवासमोर नंदी नाही ; जाणून घ्या आख्यायिका... appeared first on पुढारी.