निसर्गसंपन्न नाशिकचे वातावरण अत्यंत अल्हाददायक आणि सुदृढ असल्याचे बोलले जात असले तरी, प्रत्यक्षात नाशिकच्या हवा सातत्याने दुषित होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वॉलिटी इंडेक्स – Air Quality Index) सातत्याने वाढत आहे. बुधवारी (दि. ७) हा निर्देशांक १३२ वर पोहोचल्याने नाशिककरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिकची हवा समाधानकारक असली तरी, सतत वाढणारा निर्देशांक नाशिककरांना आत्मपरिक्षण करायला लावणारा ठरत आहे.
सणासुदीच्या काळात सर्वच शहरांमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) वाढत असतो. त्यास नाशिकही अपवाद नाही. नोव्हेंबर २०२३ मध्ये नाशिकचा निर्देशांक २१० पर्यंत पोहोचला होता. तेव्हा हेच प्रमाण दिल्लीत ४४० वर तर मुंबई, पुण्यात अडीचशेपार गेले होते. नाशिकमध्ये हवेचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे असले तरी, सूक्ष्म धुलिकणाचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत असल्याने सणासुदीनंतरही नाशिकमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खराब स्थितीत आहे. १३२ निर्देशांक खराब स्थिती दर्शविणारा असल्याने, काही भागात तो सातत्याने वाढत आहे. विशेषत: केटीएचएम, अंबड एमआयडीसी, हिरावाडी, पांडवनगरी या भागात सरासरी तो १५० च्या आसपास नोंदविला जात आहे. केटीएचएम महाविद्यालय परिसरात जानेवारी २०२३ मध्ये नऊवेळा मध्यम स्वरुपाची गुणवत्ता नोंदविली गेली. फेब्रुवारी पाच, मार्चमध्ये चार, जूनमध्ये एक, जुलैमध्ये एक असे हे प्रमाण नोंदविले गेले. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, रस्त्यांवरील खड्यांमुळे वाहने संत गतीने प्रवास करीत असल्याने ते सरासरीपेक्षा अधिक काळ रस्त्यावर असतात. याशिवाय वाहतुक कोंडी या दोन्ही कारणांमुळे प्रदूषण होत असल्याने, त्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. याशिवाय बहुतांश भागात धुळीचे प्रमाण अधिक आहे. बांधकाम स्थळी पुरेशी काळजी घेतली जात नसल्यानेही त्याचा परिणाम हवेवर होत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निरीक्षण आहे. (Air Quality Index)
हवेचा गुणवत्ता निर्देशांक याप्रमाणे
नवी मुंबई 191
मुंबई 172
जळगाव 189
ठाणे 174
बदलापूर 170
उल्हासनगर 158
औरंगाबाद 154
कल्याण 150
धुळे 143
अकोला 142
सोलापूर 140
पिंपरी चिंचवड 138
परभणी 136
सांगली 134
पुणे 127
नाशिक 132
बेलापूर 128
१३२ निर्देशांक काय सांगतो?
संवेदनशील लोकांना आरोग्यावर त्वरित परिणाम जाणवू शकतात. प्रदीर्घ काळ संपर्कात राहिल्यास निरोगी लोकांना किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात. घराबाहेरील कामे मर्यादित ठेवा.
एक्युआय असा मोजतात
सुक्ष्म कण, ओझोन, नायट्रोनज डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉऑक्साइड हवेत हे प्रदूषित घटक असतात. हे प्रदूषक घटक हवेत मिसळल्यास वायू प्रदूषण होते. या प्रदूषकांची सांद्रता मूल्ये तपासली जातात. त्यानुसार, हवेचा गुणवत्ता निर्देशांक काढला जातो.
असा ठरवतात हवा गुणवत्ता निर्देशांक
० ते ५० – चांगला – रंग हिरवा
५१ ते १०० – समाधानकारक – रंग हिरवा
१०१ ते २०० – मध्यम – रंग पिवळा
२०१ ते ३०० – खराब – रंग केशरी
३०१ ते ४०० – अतिखराब – रंग लाल
४०१ – गंभीर – (निरोगी लोकांना धोका) – रंग तपकिरी
हेही वाचा:
- रतन टाटांची ‘स्वप्नपूर्ती’, मुंबईत साकारले पाळीव प्राण्यांसाठी जागतिक दर्जाचे हॉस्पिटल
- विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण : हर्षवर्धन पाटील
- Sindhudurg Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
The post नाशिकचा हवा गुणवत्ता निर्देशांक १३२ वर; मुंबई, पुणे च्या तुलनेत समाधानकारक appeared first on पुढारी.