नाशिकच्या महिला पोलिस निरीक्षकाने केले एव्हरेस्ट सर

नाशिकच्या महिला पोलिस निरीक्षकाने केले एव्हरेस्ट सर

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : पोलिस दलात सेवा बजावताना वाचनातून एव्हरेस्ट शिखराबद्दल कुतूहल जागरूक झाले. त्यानंतर माऊंट एव्हरेस्ट सर करायचेच, या निश्चयाने महाराष्ट्र पोलिस अकादमीतील पोलिस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोके (वय 49) यांनी जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर (8,849 मीटर) दुसर्‍या प्रयत्नात सर केले. शिखरावर जाऊन त्यांनी आई-वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. जिद्द, महत्त्वाकांक्षा अन् कठोर परिश्रमाच्या जोरावर 22 मे रोजी त्यांनी एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा, पोलिस दलाचा ध्वज फडकावला.

द्वारका डोके या 2006 मध्ये सरळ सेवेतून पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात सहभागी झाल्या. त्यांना गिर्यारोहणाचीही आवड असून, वाचनावरही त्यांचा भर असतो. वाचनातून एव्हरेस्टबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा निश्चय केला. 2022 मध्ये त्यांनी पहिला प्रयत्न केला. मात्र, शारीरिक त्रासामुळे ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. मात्र, प्रबळ इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा आणि एव्हरेस्टचे आकर्षण, यामुळे डोके यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले.

2023 मध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमीत त्यांनी पूर्वतयारीस सुरुवात केली. विविध सराव करून त्यांनी स्वत:ला या मोहिमेसाठी सज्ज केले. 24 मार्च 2024 रोजी त्या नेपाळच्या काठमांडू येथे पोहोचल्या. तेथे त्यांनी नेपाळमधील शिखर सर करणार्‍या पासंग शेरपा यांच्या मार्गदर्शनाखाली एव्हरेस्ट चढण्यास सुरुवात केली. सलग 55 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हवामान बदल, हिमवर्षाव, जोरदार वारा अशा नैसर्गिक आव्हानांचा सामना करत त्यांनी एव्हरेस्टची चढाई सुरू ठेवली.

22 मे रोजी पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी एव्हरेस्टचे टोक गाठले. तेथे आठ मिनिटांची विश्रांती घेत तिरंगा व महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज अभिमानाने फडकावला अन् दिवंगत आई-वडिलांची फोटोफ्रेम हातात घेत श्रद्धांजली अर्पण केली. वयाच्या पन्नाशीत एव्हरेस्ट सर करणार्‍या त्या महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला पोलिस अधिकारी असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, एव्हरेस्टवरून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे 24 मे रोजी सायंकाळी पोहोचल्या. तेथून त्या त्यांच्या मूळगावी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे पोहोचल्या. तेथे त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

सर्वोच्च शिखराचे आकर्षण 2016 पासून
2016 पासून एव्हरेस्ट सर करण्याचे आकर्षण होते. त्यासाठी प्रयत्नही सुरू होते. दरम्यान, आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांना जगावेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ध्येय बाळगले होते. जेव्हा देशाचा तिरंगा व पोलिस दलाचा ध्वज एव्हरेस्टवर फडकावला, तेव्हा अभिमानाने ऊर भरून आला.
– द्वारका डोके, पोलिस निरीक्षक, एव्हरेस्टवीर