नाशिक : अग्निप्रतिबंधात्मक साहित्याची अखेर खरेदी

फायरबॉल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अग्निप्रतिबंधात्मक साहित्य खरेदीला अखेर मुहूर्त लागला आहे. दोन महिन्यांचा काथ्याकुट केल्यानंतर प्रशासनाने २० फायरबॉल व ४० अग्निप्रतिबंधात्मक यंत्रे खरेदी केली आहेत. त्यापैकी १५ तालुक्यांना प्रत्येकी २ याप्रमाणे यंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

हेरिटेज वास्तूचा दर्जा प्राप्त असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीसह परिसरात मागील काही वर्षांत आग लागण्याच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेेत. यंत्रणांनी तातडीने आगीच्या या घटनांवर नियंत्रण मिळवले. मात्र, त्यासोबत कार्यालयाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. त्यामुळे प्रशासनाने या घटनांतून धडा घेत मुख्य इमारतीत आग रोखण्यासाठी अधिक बळकट उपाययोजना राबवण्यावर भर दिला आहे. त्यानुसार मुख्यालयासाठी २० फायरबॉलसह प्रत्येकी ६ किलोची ४० अग्निप्रतिबंधात्मक यंत्रे खरेदी केली. त्यामधून प्रत्येक तालुक्याला दोन अग्निप्रतिबंधात्मक यंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. उर्वरित १० यंत्रे व २० फायरबॉल हे जिल्हा मुख्यालय आवारात बसविण्यात येणार आहेत. या यंत्रणेमुळे भविष्यात कार्यालयाच्या आवारातील आगीच्या घटना रोखण्यात यश मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे. असे असले, तरी प्रत्यक्षात अग्निप्रतिबंधात्मक साहित्य खरेदीसाठी दोन महिन्यांपासून प्रशासन चाचपडत होेते.

मुख्यालयात आगीच्या घटना रोखण्यासाठी प्रथम फायरबॉल विकत घेण्यापासून ते कार्यालयात ते कोठे बसवावे? किती किलोचे फायरबॉल विकत घ्यावे, अशा विविध गोष्टींवर खल झाला. त्यातच मध्यंतरीच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे खरेदीचा मुद्दा काहीसा मागे पडला होता. सरतेशेवटी २ दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाला हे साहित्य उपलब्ध झाले आहे.

जागांचा निश्चिती

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निप्रतिबंधात्मक साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. मुख्यालयात २० ठिकाणी फायरबॉल बसविले जाणार असून, त्यासाठी जागा निश्चित झाली आहे. तालुक्यांना प्रत्येकी दोन अग्निप्रतिबंधात्मक यंत्रे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : अग्निप्रतिबंधात्मक साहित्याची अखेर खरेदी appeared first on पुढारी.