नाशिक : आगीत वाळूचा ट्रक जळून खाक

पंचवटी www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

वाळू वाहणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली असून, यात ट्रक जळून खाक झाला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास यश मिळाले असले तरी ट्रक संपूर्ण जळून खाक झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावजवळ देवी इंजिनिअरिंग वेल्डिंग वर्कशॉप आहे. या ठिकाणी सोमवारी (दि. ६) अशोक कुमार (रा. इटावा, उत्तर प्रदेश) यांचा वाळू वाहतूक ट्रक पत्रा वेल्डिंग कामासाठी आला होता. वेल्डिंग काम सुरू करण्यापूर्वी ट्रकच्या बॅटरीच्या वायरिंग काढण्यास कामगारांना विसर पडला. यामुळे पत्रा वेल्डिंग काम सुरू करताच स्पार्किंग होऊन गाडीने पेट घेतला. या घटनेची माहिती आडगाव गुन्हे शोध पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान के. के. वाघ महाविद्यालयाजवळील अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. फायरमन आर. व्ही. पाटील, आर. डी. सोनवणे, व्ही. जी. चव्हाणके, वाहनचालक डी. ए. धोत्रे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
ट्रक पेटलेला असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखत शेजारील खासगी कंपनीच्या पेट्रोलपंपावर कुठलाही अनर्थ घडू नये, यासाठी खबरदारी घेतली. आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, पोलिस हवालदार देवराज सुरंजे, पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे यांनी सर्वप्रथम पेट्रोलपंपावरील वीजपुरवठा खंडित केला व तेथील पेट्रोल भरण्याचे कामकाज बंद केले.

हेही वाचा:

The post नाशिक : आगीत वाळूचा ट्रक जळून खाक appeared first on पुढारी.