नाशिक : कांदा अनुदान अर्ज तपासणीच्या चक्रव्यूहात

कांदा www.pudhari.news

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून बाजार समित्यांकडे केलेल्या अर्जांच्या तपासणीच्या सूचना पणन विभागाकडुन देण्यात आल्या आहेत. संबंधित बाजार समिती, थेट पणन अनुज्ञप्तीधारक आणि खासगी बाजार समित्यांमध्ये झालेली आवक, खरेदी आणि विक्रीबाबतची इत्थंभूत आकडेवारी तपासली जाणार आहे.

1 फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खासगी बाजार किंवा थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेड केंद्राकडे कांदा विक्री केली आहे, अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रतिशेतकरी या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार कांदा प्रस्तावासाठी सर्व बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्राकडील शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील आवक नोंदवही व अन्य संबंधित दस्तऐवजातील माहिती विचारात घेतली जाणार आहे. काही बाजार समित्यांमध्ये दि. २० मार्चनंतर मोठ्या प्रमाणात कांदा आवक झाल्याचे आढळले आहे. एक फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीमध्ये झालेली आवक आणि दि. २१ ते ३१ मार्च या कालावधीत झालेल्या आवकमध्ये पणन मंडळांकडे बाजार समित्यांनी सादर केलेल्या दैनंदिन कांदा आवकच्या आकडेवारीवरून मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली. तालुकास्तरीय छाननी समितीला संशयास्पद वाटणाऱ्या प्रकरणांच्या तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दि. २१ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत संबंधित अडत्याने / व्यापाऱ्याने शेतकऱ्यास कांदाविक्री रक्कम कशा प्रकारे अदा केली, याबाबत खातरजमा केली जाणार आहे. कांदाविक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा केली असल्यास अशा अडत्या / व्यापाऱ्याचे अकाउंट बुक, आर्थिक व्यवहाराच्या नोंदी, जांगड रजिस्टर तपासले जाणार आहे. रोख रक्कम मिळाल्याबद्दल संबंधित कांदाविक्रेत्याची स्वाक्षरी तपासली जाणार आहे. तसेच संबंधित आडते / व्यापारी यांच्या रकमांच्या नोंदींचा तपशील त्यांच्या बँकखात्यातून तपासला जाणार आहे. तसेच दि. २९ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत शेतकऱ्यास रक्कम रोखीने दिली असल्यास त्याबाबतच्या कारणांची सत्यता पडताळली जाणार आहे. छाननी समितीला संशयास्पद वाटणाऱ्या प्रकरणांत संबंधित आडते / व्यापाऱ्याने खरेदी केलेला कांदा विक्रीसाठी अन्य राज्यात पाठविताना तयार केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. तसेच बाजार समिती / खासगी बाजारांनी दररोज आवकबाबत पणन मंडळास सादर केलेली ऑनलाइन माहिती ग्राह्य धरली जाणार आहे.

बाजार समितीच्या आवक नोंदीच ग्राह्य धरणार
संबंधित आडते / व्यापाऱ्याने संबंधित बाजार समिती, पणन अनुज्ञप्तीधारक, खासगी बाजार, नाफेड खरेदी केंद्राकडे कांदा खरेदीबाबत प्रतिदिनी दिलेली आकडेवारी व कांदा अनुदान प्रस्तावामध्ये संबंधित आडते, व्यापारी यांच्याकडील कांदाविक्री पट्टीवरील एकूण आकडेवारी या दोन्ही आकडेवारींची तपासणी केली जाणार आहे. बाजार समितीच्या आवक रजिस्टरमधील थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडील आवक रजिस्टर, खासगी बाजाराचे आवक रजिस्टर, नाफेड खरेदी केंद्राचे आवक रजिस्टरमधील कांदाखरेदी आकडेवारी ही संबंधित आडते, व्यापारी यांच्याकडील आवकबाबत प्रतिदिनी मिळतीजुळती असली पाहिजे. बाजार समितीच्या आवक रजिस्टरमध्ये नोंद केलेली आकडेवारीच ग्राह्य धरली जाणार असल्याचे पणन विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कांदा अनुदान अर्ज तपासणीच्या चक्रव्यूहात appeared first on पुढारी.