नाशिक : काळ्या रंगाच्या कारमधून मांसवाहतूक, लासलगावी दाेघे ताब्यात

lasalgaon crime,www.pudhari.news

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील बाजारतळ येथे मांस असलेली कार व पाच संशयितांपैकी दोघांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वाहन जप्त केल्याची माहिती निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी दिली. या घटनेने लासलगाव शहरात काही काळ तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.

येवला येथून लासलगाव बाजारतळ येथे आलेल्या काळ्या रंगाच्या कार क्रमांक एमएच ०१, एपी १७३९ मध्ये शहरातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मांस असल्याचे लक्षात आले. हे मांस इसाक गफूर शहा यांच्या घरात उतरवून त्याची शहरात विक्री केली जाणार होती. याबाबत कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे व पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्यातील सुमारे एक लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आलीम सलीम मोहम्मद, अरबाज मोहम्मद युसूफ (रा. येवला) या दोघांना ताब्यात घेतले असून, या गुन्ह्यातील संशयित एजाज युसूफ कुरेशी (रा.येवला), इसाक गफूर शाह व मंगला नेटारे (रा. लासलगाव) यांचा पोलिस शोध घेत आहेत.

दरम्यान, लासलगाव पोलिस ठाणे परिसरात संशयितांना आणल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ जमलेले व विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल तसेच शहरातील काही तरुण समोरासमोर आल्याने शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिस अधिकारी तांबे यांनी दोन्ही समाजातील नागरिकांची तातडीने बैठक घेत गुन्हा दाखल करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्ष पोलिस निरीक्षक सुर्वे, सायखेडा, पोलिस स्टेशन सहायक पोलिस निरीक्षक पप्पू कादरी, लासलगाव पोलिस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे, पोलिस उपनिरीक्षक आनंद पठारे, लासलगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार देवडे, पोलिस हवालदार कैलास महाजन, पोलिस नाईक योगेश शिंदे, औदुंबर मुरडणार, किशोर लासुरकर, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे, सुजय बारगळ, सागर आरोटे, दगू शिंदे, भगवान सोनवणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.

हेही वाचा :

The post नाशिक : काळ्या रंगाच्या कारमधून मांसवाहतूक, लासलगावी दाेघे ताब्यात appeared first on पुढारी.