नाशिक : केंद्रीय मंत्री ना.डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्तीने कॉंग्रेसचे उपोषण तूर्तास मागे

चांदवड www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भ्रमणध्वनीवरून कोतवाल व उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार डॉ. पवार यांच्या आश्वासनानंतर दोन दिवसापासून सुरु असलेले उपोषण प्रांत देशमुख यांच्या हस्ते पाणी पाजून उपोषण तूर्तास मागे घेण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

कांदा, द्राक्ष व भाजीपाला या शेतीमालास कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. असे असताना केंद्र व राज्य सरकार कोणत्याही उपाययोजना करीत नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, तालुकाध्यक्ष संजय जाधव, विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवार (दि.३) रोजी सकाळी ११ वाजेपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. उपोषणाच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी लिलाव बंद करीत उपोषणास पाठिंबा दर्शविला होता. यावेळी परदेशात कांदा पिकाला असलेली मागणी व तेथील भाव बघता देशातील कांदा हा कवडीमोल दराने विक्री होत आहे. जर येथील कांदा परदेशात विक्रीसाठी सरकारने उपाययोजना केल्यास देशातील कांदयास चांगले भाव मिळण्याची शक्यता आहे. मात्र केंद्र सरकार कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने देशात कांद्याचे दर कोसळत आहेत. यास सरकार जबाबदार असून सरकारला जाब विचारण्यासाठी उपोषणाचे शस्त्र हाती घेण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिबंधक सविता शेळके, प्रशासक अनिल पाटील, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे आदींनी आंदोलनकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र आंदोलनकर्ते निर्णयावर ठाम असल्याने आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी चांदवड कांदा व्यापारी असोसिएशनने देखील त्यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविला.

शनिवारी, दि. 4 सायंकाळच्या सुमारास प्रांत देशमुख, पोलीस निरीक्षक बारवकर, उपनिबंधक सविता शेळके, प्रशासक अनिल पाटील, गांगुर्डे यांनी माजी आमदार कोतवाल यांच्याशी चर्चा केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कोतवाल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता नाफेडद्वारा कांदा खरेदी केली आहे, तसेच कांद्याला अनुदान देण्यास सरकार विचार करीत आहे. त्यामुळे उपोषण सोडण्याची विनंती डॉ. पवार यांनी कोतवाल यांना केली. त्यावरून तूर्तास उपोषण मागे घेतो परंतु मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा नव्या ताकदीने आम्ही उपोषण करू तेव्हा कोणाचेही ऐकणार नाही असे कोतवाल यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : केंद्रीय मंत्री ना.डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्तीने कॉंग्रेसचे उपोषण तूर्तास मागे appeared first on पुढारी.