नाशिक : लघु उद्योगांना विनातारण पाच कोटींपर्यंत कर्ज

उद्योग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सूक्ष्म व लघु उद्योगांना आता पाच कोटींपर्यंत विनातारण कर्ज मिळणार आहे, अशी माहिती भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी दिली. केंद्र सरकारने उद्योगांसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.

सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी भांडवल उभारणीसाठी खूपच थोडे पर्याय उपलब्ध असतात. त्यातही बँका तारण मागतात. त्यामुळे केंद्र सरकारतर्फे क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अ‍ॅण्ड स्मॉल एंटरप्राइजेस सीजीटीएमएसई ही योजना सुरू होती. या अंतर्गत सूक्ष्म व लघु उद्योगांना दोन कोटींपर्यंत विनातारण कर्ज मिळण्याची सोय आहे. त्यावर व्याजदर सोडून अधिकची दोन टक्के, काही ठिकाणी तीन टक्क्यांपर्यंत कर्जदाराला गॅरंटी फी द्यावी लागत असे. राष्ट्रीय उद्यम बोर्डचे सदस्य पेशकार यांनी केंद्रीय बैठकीत या गॅरंटी फी कर्जदाराकडून न घेता बँकांकडून घेतली पाहिजे अशी मागणी केली होती. तसेच विनातारण कर्ज मर्यादा दोन कोटींवरून पाच कोटी करावी अशीही मागणी केली होती. ही मागणी केंद्र शासनाने पूर्ण करीत कर्जाची मर्यादा पाच कोटी केली आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेऊन उद्योग क्षेत्राला दिलासा दिल्याचे पेशकार यांनी सांगितले. तसेच सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका तसेच ज्या सक्षम व त्यांची पूर्तता करतील, अशा सर्व सहकारी बँकांकडून क्रेडिट गॅरंटी योजनेखाली पाच कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्याचप्रमाणे गॅरंटी फीमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर सवलत मंजूर करून 10 लाखांपर्यंत कर्जावर 0.37 टक्के, 10 ते 50 लाखांपर्यंत 0.55 टक्के, 50 ते एक कोटीपर्यंत 0.60 टक्के, एक ते दोन कोटींपर्यंत 1.20 टक्के, दोन ते पाच कोटींपर्यंत 1.35 टक्के गॅरंटी फी आकारली जाईल. पर्यायाने विनातारण कर्ज घेणार्‍या उद्योगांवर आता वार्षिक बोजा कमी पडणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : लघु उद्योगांना विनातारण पाच कोटींपर्यंत कर्ज appeared first on पुढारी.