आठवडाभरानंतरही करंजकर नाराजच; ‘मातोश्री’वरील भेटही टळली

विजय करंजकर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी डावलली गेल्याने व्यथित असलेल्या विजय करंजकर यांची नाराजी आठवडाभरानंतरही कायम राहिली आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची रविवारची भेट टळल्यानंतर करंजकर यांना मातोश्रीवरूनच वेटींगवर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ सिन्नरमध्ये आयोजित जाहीर सभेतही करंजकर गैरहजर राहिल्याने निवडणूक लढविण्याची त्यांची मनिषा कायम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यासंदर्भात करंजकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे विजय करंजकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. किंबहुना गेल्या वर्षभरात झालेल्या ठाकरे गटाच्या बैठका, मेळाव्यांमध्ये करंजकर हेच उमेदवार असल्याचे पक्षाच्या नेत्यांकडूनच सांगण्यात येत होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत करजंकर हेच उमेदवार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे करंजकर यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. उमेदवारी गृहीत धरून करजंकर यांनी सिन्नर व इगतपुरी या भागात प्रचाराला जोर लावला होता. मात्र एेनवेळी करंजकर यांचे नाव मागे पडले. ठाकरे गटातर्फे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे करंजकर नाराज झाले असून त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मराठा समाजाच्या बैठकीलाही त्यांनी हजेरी लावल्याने त्यांची नाराजी दूर करण्याचे पक्षासमोर आव्हान उभे राहिले. यादरम्यान करंजकर आपलेच असल्याचे सांगत त्यांची मनधरणी केली जाईल, असे पक्षप्रमुखांनी जाहीर केल्याने रविवारी करंजकर हे ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी गेल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर आजतागायत करंजकर यांना मातोश्रीवरून बोलावणे आलेले नाही. पक्षाकडून त्यांनी नाराजी दूर झाली नसल्याचे चित्र आहे. करंजकर यांची नाराजी दूर करण्यासाठी स्थानिक नेते प्रयत्न करत असले तरी,त्यांना करंजकरांकडून दाद मिळत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात करंजकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हेही वाचा:

The post आठवडाभरानंतरही करंजकर नाराजच; 'मातोश्री'वरील भेटही टळली appeared first on पुढारी.