Nashik : अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेविरोधात निसर्गप्रेमींचे जटायूपूजन

नाशिक,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अंजनेरी ब्रह्मगिरी प्रस्तावित रोपवेला विरोध करण्यासाठी रविवारी (दि. 25) सकाळी पर्यावरणप्रेमींनी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी जटायूपूजन केले. रोपवेविरुद्धचा लढा तीव्र करण्याचा निर्णय सर्व निसर्गप्रेमी व ग्रामस्थांकडून घेण्यात आला.

पर्यावरणप्रेमी निसर्गसंवर्धनासाठी काम करणारे विविध संघटनांचे प्रतिनिधी, साधू, संत, मेटघर किल्ला येथील ग्रामस्थ उपस्थित होते. अंजनेरीची जैवविविधता आणि ब्रह्मगिरीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी निर्सगप्रेमींनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. अंजनेरी – ब्रह्मगिरी रोपवे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रस्तावित केला आहे. 600 कोटी रुपयांहून अधिक खर्च असलेला हा प्रकल्प अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या दोन पर्वतांना जोडणारा आहे.

रोपवेला पर्यावरणवादी संघटनांनी तसेच मेटघर किल्ला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. या अभियानाचा प्रारंभ करण्यासाठी रविवारी येथे जटायूपूजन करण्यात आले. या परिसरात स्वच्छतादूत गिधाड पक्ष्यांचा अधिवास आहे. मानवी हस्तक्षेपाने दुर्मीळ होत चाललेल्या गिधाड प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी अंजनेरी राखीव क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. तरीदेखील केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेंतर्गत पर्यटनास चालना देण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी ब्रह्मगिरी अंजनेरी रोपवे प्रस्तावित केला असून, त्यासंबंधी निविदा सूचना प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे एकीकडे केंद्रशासन अंजनेरीला अभयारण्य घोषित करण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर त्याच वेळेस खासदार मात्र रोपवे तयार करून येथील पर्यावरणास हानीकारक परिस्थिती निर्माण करत असल्याचा आरोप रविवारी येथे जमलेल्या पर्यावरणप्रेमींनी केला. ब्रह्मगिरीवर पर्यटन वाढवण्यासाठी रोपवे कशासाठी? असाही प्रश्न वारकरी उपस्थित करत आहेत.

ब्रह्मगिरी पर्वतावर रोपवे सुरू झाल्यास पर्वतावर जाण्यासाठी डोलीचा पारंपरिक व्यवसाय कायमस्वरूपी बंद होण्याची भीती मेटघर किल्ला ग्रामस्थांना वाटत आहे. अंजनेरी, मेटघर किल्ला येथील ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी नागरिक लवकरच वनमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मेटघर आनंद आखाड्याचे महंत गिरजानंद सरस्वती महाराज, मेटघर ग्रामपंचायत सरपंच झोले, माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर, प्रकाश दिवे, कैलास देशमुख व हरित ब्रह्मगिरी संस्थेचे सदस्य रमेश अय्यर, भारती जाधव, अरविंद निकुंभ यांच्यासह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post Nashik : अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेविरोधात निसर्गप्रेमींचे जटायूपूजन appeared first on पुढारी.