नाशिक : डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

येवला www.pudhari.news

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार टोळीचा येवला तालुका पोलीसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी चार अट्टल गुन्हेगारांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

येवला तालुका पोलीस ठाण्यात राजापूर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बस मधील डिझेल चोरीच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नाशिक ग्रामीण तसेच येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस ठाण्यातील तपास पथक सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस हवालदार माधव सानप, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर हेंबाडे, पोलीस नाईक राजेंद्र केदारे, पोलीस नाईक सचिन वैरागर, पोलीस नाईक ज्ञानेश्वर पल्हाळ, पोलीस कॉन्सटेबल संतोष जाधव, पोलीस कॉन्सटेबल सागर बनकर, पोलीस कॉन्सटेबल आबासाहेब पिसाळ यांच्या पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळी निरीक्षण केले. त्यानुसार एस. टी. बस पार्कींग येथील ठिकाणी प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहीतीचे विश्लेषण करुन गोपनीय माहीतीनुसार गुन्ह्यातील मास्टर माईन्ड अमोल भाऊसाहेब कोटमे (२६, रा. कोटमगांव बिठ्ठलाचे ता. येवला जि. नाशिक) यास ताब्यात घेत सखोल चौकशी करण्यात आली.

कोटमे याचे साथीदार विजय गणपत जाधव (३७, रा. गोंदवणी रोड वार्ड नं. श्रीरामपूर जि. अहमदनगर, हल्ली रा. पद्मकुंज),  सुशिल ढोमसे (अंगणगांव ता. येवला जि. नाशिक),  शुभम संदीप गायकवाड (२०, रा. कोटमगाव खु॥ (देवीचे) ता. येवला), राजेंद्र उर्फ बंडू अशोक कोटमे (३०, रा. कोटमगांव विठ्ठलाचे ता. येवला) यांना वेगवेगळे ठिकाणावरुन शोध घेवून ताब्यात घेतले. संशयित चोरट्यांनी राजापूर ता. येवला जि. नाशिक येथे बस (क्र. MH १४, BT – ३८११) मधील डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. तर लुटमार करणाऱ्यांपैकी एक साथीदार फरार आहे. संशयितांपैकी चार गुन्हेगारांना अटक करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. संशयितांकडून डिझेल चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार (क्र. MH-०४ FZ-२७१३) किमत रुपये ३१००००/- व ७०/- लिटर चोरी केलेले डिझेल व डिझेल चोरीचे साहित्य असा एकुण ६३०००/- रुपये तर संपूर्ण साहित्य असे एकूण ३७०३००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित आरोपींकडून येवला तालुका पोलीस डिझेल चोरीचे तीन गुन्हे उघड झाले असून इतर गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे. त्यांच्याकडून येवला शहर पोलीस ठाणे, वैजापूर पोलीस ठाणे, कोपरगाव पोलीस ठाणे यांच्याकडील देखील डिझेल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.