नाशिक : तपोवनात अतिक्रमण निर्मूलन पथक-झोपडीधारकांमध्ये धुमश्चक्री

अतिक्रमण निर्मूलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तपोवनात मंगळवारी (दि.२३) अनधिकृत झोपड्या हटविताना मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक अन् झोपडीधारकांमध्ये चांगलीच धुमश्चक्री बघावयास मिळाली. पथकातील कर्मचारी अन् झोपडपट्टीधारकांमध्ये झटापट झाल्याने, संतप्त झोपडपट्टीधारकांनी पथकावर दगडफेक केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अतिक्रमण धारकांना रोखताना पोलिस

सध्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून संपूर्ण शहरात धडक मोहीम राबविली जात असून, अतिक्रमणे जमीनदोस्त केली जात आहेत. पंचवटी, सातपूर, सिडको, नवीन नाशिक, नाशिकरोड या भागांत आतापर्यंत मोहिमा राबववून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटविण्यात आले आहे. मंगळवारी (दि.२३) तपोवनातील अनधिकृत झोपड्या हटविण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक पोहोचले असता, झोपडपट्टीधारकांनी त्यास विरोध केला. मात्र, पथकाने विरोधाला न जुमानता झोपड्या हटविण्यास सुरुवात केली. झोपड्या हटविण्यासाठी जेसीबीही घटनास्थळी पोहोचला होता, परंतु नागरिकांचा विरोध लक्षात घेता पथकातील कर्मचाऱ्यांनीच झोपड्यांचे बांबू हटविण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, काही नागरिक व महिला अतिक्रमण पथकाकडे धावून गेले. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला आक्रमक असल्याचे बघून कर्मचाऱ्यांनी काहीसा सावध पवित्रा घेतला.

अतिक्रमण हटविताना महापालिकेचे पथक

याचदरम्यान, झोपडपट्टीधारकांनी पथकावर दगडफेक केल्याने, सर्वांची पळापळ झाली. यावेळी पथकाच्या वाहनांच्या काचा फुटल्या. सुदैवाने कोणासही दुखापत झाली नाही. दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

The post नाशिक : तपोवनात अतिक्रमण निर्मूलन पथक-झोपडीधारकांमध्ये धुमश्चक्री appeared first on पुढारी.