नाशिक : देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेसचे उपोषण

देवळा,www.pudhari.news

देवळा : पुढारी वृत्तसेवा ;  देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी आज शनिवार (दि. ४ )पासून देवळा येथे राष्ट्रीय कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्य शासनाने दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी काढलेल्या शासननिर्णयात राज्यातील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला असून  यात चांदवड-देवळा तालुक्यांचा समावेश नाही.

देवळा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून, मजूर वर्गाच्या हाताला काम नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा या मागणीचे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यापूर्वी प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले होते.  निवेदनानंतरही शासनाकडून देवळा तालुका दुष्काळी जाहीर होण्याबाबत कुठलीही कार्यवाही होतांना दिसून आली नाही.
याच्या निषेधार्थ देवळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज देवळा पाचकंदील समोर काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष दिनकर निकम, प्रांतिक सदस्य दिलीप पाटील, आर्की. स्वप्निल सावंत. दिलीप आहेर, बाळासाहेब शिंदे, अरुणा खैरनार आदी पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

शनिवारी उपोषणस्थळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल ,ठाकरे गटाचे सुनील पवार, गटप्रमुख प्रशांत शेवाळे, बाजार समितीचे माजी संचालक ड.  राजेंद्र ब्राम्हणकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, दिनकर जाधव, महेंद्र आहेर, संजय सावळे, संदेश निकम, समता परिषदेचे मनोहर खैरनार, हिरामण आहेर, प्रवीण सूर्यवंशी, राजेंद्र शेवाळे, तुषार शिंदे आदींनी भेट दिली.

तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्याना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम असल्याने तहसीलदारांना माघारी फिरावे लागले.

The post नाशिक : देवळा तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेसचे उपोषण appeared first on पुढारी.