नाशिक : पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांची बदली नको….

लासलगाव www.pudhari.news
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आले असून यामध्ये पन्नाशी ओलांडलेल्या प्राथमिक शिक्षकांची अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी यादी प्रसिद्धी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या अंतिम सहावा राऊंड यामध्ये 53 + सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होणार आहे.
शासन स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते अंबादास वाजे व राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी राज्य बदली प्रमुख आयुष प्रसाद यांना गुरुवारी (दि.23) पुणे येथे लेखी निवेदन देऊन 53 + वरील शिक्षकांच्या बदल्या करू नयेत, या संदर्भात निवेदन देण्यात आले.
अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी सोप्या क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात सक्तीने रिक्त (सीव्ही) ठेवण्यात आल्या आहेत. अंतिम फेरीत सोप्या क्षेत्रातील बदली पात्र नसताना अवघड क्षेत्रात बदली होणार आहे हे सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्यायकारक आहे. सर्वाधिक सक्तीने रिक्त जागा या सोप्या भागातील ठेवण्यात आले आहेत. तर हे आरटीई (R.T.E) कायद्याच्या विरोधात असल्याने सोप्या भागातील शिक्षकांची बदली त्यामुळे होणार आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होत असल्याने या भागातील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे. परिणामी शिक्षकांचे समप्रमाण राखण्यासाठी अवघड क्षेत्रातील जागा भरण्याचा अट्टाहास शासन स्तरावर करू नये. संवर्ग-1 मधील बऱ्याच शिक्षकांनी होकार अथवा नकार न कळवल्याने असे शिक्षकांची बदली यामध्ये होणार आहे.  त्यामुळे त्यांची बदली न करता त्यांना नकार कळवण्याची एक संधी मिळायला हवी. त्यासाठी संबंधित विभागाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरताना पदवीधर व मुख्याध्यापक यांना त्त्काळ पदोन्नती द्यावी, त्यानंतर शिक्षकांची पदे जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांमधून अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यात याव्यात. तसेच केंद्रप्रमुख व पदवीधर यांचा न्यायालयीन निपटारा करून अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भराव्यात. जेणेकरुन बदली प्रक्रियेतील अंतिम सहावी फेरी रद्द करण्यास यावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष अंबादास वाजे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, राज्य कोषाध्यक्ष उत्तम वायाळ, कार्याध्यक्ष पोपट सूर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास विभागाचे सचिव, उपसचिव प्रशांत पाटील, शालेय शिक्षण विभागाचे अप्पर सचिव यांना पाठवण्यात आले आहेत.
53 + वरील सेवाज्येष्ठ शिक्षक बदली पात्र नसताना केवळ होकार अथवा नकार न कळवल्यामुळे तो अवघड क्षेत्रातील बदलीस पात्र होईल. हा त्या शिक्षकांवरील अन्याय आहे. त्यामुळे अवघड क्षेत्रात वयोवृद्ध व आजारी शिक्षकांना पाठवणे हे अमानवी आहे. यासाठी शासनाने अवघड क्षेत्रातील पदे भरण्यासाठी आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक व शिक्षण सेवकभरती तत्काळ केल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होईल. – अर्जुन ताकाटे, जिल्हा अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ.

The post नाशिक : पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांची बदली नको.... appeared first on पुढारी.