नाशिक : बोनमॅरो दान देत बहिणीची भावाला रक्षाबंधनाची भेट

बोनमॅरो दान,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रक्षाबंधनाचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शहरातील एका बहिणीने आजाराने पीडित भावाला बोनमॅरो (स्टेमसेल्स) दान करत अनोखी भेट दिली. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नामको हॉस्पिटलमध्ये बोनमॅरो प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ असलेला हा तरुण औषधनिर्माण (फार्मसी) शाखेत शिक्षण घेत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अधून-मधून थंडी-ताप, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा यांसारख्या लक्षणांनी तो आजारी होता. औषधनिर्माणाचा अभ्यास करत असल्याने आपले हे दुखणे नेहमीचे आजारपण नसल्याचे त्याला लगेच जाणवले. त्याने ही बाब त्याच्या पालकांना सांगितली. त्यानंतर या कुटुंबाने नामको हॉस्पिटलमधील तज्ज्ञ हिमॅटोलॉजिस्ट डॉ. सिद्धेश कलंत्री यांची भेट घेतली.

डॉ. कलंत्री यांनी रक्ताच्या विविध तपासण्या करून तरुणाला ‘अप्लास्टिक अॅनेमिया’ (शरीरातील बोनमॅरो अकार्यक्षम होणे) हा गंभीर आजार झाल्याचे निदान केले. पुढील उपचारासाठी त्याला नामको हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. नामको हॉस्पिटलमधील अद्ययावत हिमॅटॉलॉजी व बोनमॅरो ट्रान्सप्लांट विभागात डॉ. सिद्धेश कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी स्टेमसेल्स (मूलपेशी) दात्याचा शोध सुरू झाला.

रुग्णांच्या दोन्हीही बहिणींनी स्टेमसेल देण्याची तयारी दाखवली. मात्र, लहान बहिणीच्या मूलपेशी भावाच्या शरीराशी जुळत असल्याने तिची डोनर म्हणून निश्चिती झाली. तरुणाच्या शरीरातील रक्तघटकांना केमोथेरेपी देऊन नष्ट करण्यात आले. त्यानंतर डॉ. कलंत्री आणि हिमॅटोलॉजी विभागातील कुशल परिचारिकांच्या मदतीने बहिणीच्या शरीरातील स्टेमसेल्स तरुणाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्यात आल्या. या प्रक्रियेनंतर १० ते १२ दिवसांत तरुणाच्या शरीराने मूलपेशी स्वीकारल्याचे दिसून आले. रुग्णाच्या विविध तपासण्यांनंतर व रुग्णाची तब्येत स्थिर असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी पंतप्रधान सहायता निधीसोबतच साई संस्थान, वेदिक्युअर फाउंडेशन अशा संस्थांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. बोनमॅरो ट्रान्स्प्लांट शस्त्रक्रियांसाठी आवश्यक सर्व उच्च दर्जाच्या सुविधा रुग्णालयात उपलब्ध असून, रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.

– शशिकांत पारख, सेक्रेटरी, नामको चॅरिटेबल ट्रस्ट

हेही वाचा :

The post नाशिक : बोनमॅरो दान देत बहिणीची भावाला रक्षाबंधनाची भेट appeared first on पुढारी.