
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व शाळांमध्ये फायर ऑडिट बंधनकारक असले, तरी नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून फायर ऑडिटच केले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शिक्षण विभागाने अग्निमन विभागाकडे बोट दाखविले असून, मनुष्यबळाच्या अभावामुळे फायर ऑडिट केेले गेले नसल्याचे सांगितले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व महाराष्ट्र आगप्रतिबंधक, जीवसुरक्षा उपाययोजना २००६ व २००९ नुसार सर्व शाळा, कॉलेज तसेच संस्थांनी आपल्या इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविणे व यंत्रणा अद्ययावत ठेवून वर्षातून दोन वेळा त्याची नियमित तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या दीड वर्षापासून मनपा शाळांमध्ये फायर ऑडिटच केले गेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे बहुतांश शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा अद्याप बसविण्यात आलेली नाही. शहरात महापालिकेच्या एकूण १०० शाळा असून, त्यातील ६० हून अधिक शाळांची अवस्था दयनीय आहे. या शाळा मोडकळीस आल्या असून, त्यांच्या डागडुजीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. अशात या शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा असेल काय? हा खरा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर ऑडिट गरजेचे असले, तरी महापालिकेच्या संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जाणे चिंताजनक आहे.
दरम्यान, महापालिकेच्या शिक्षण विभागाने दीड वर्षापूर्वी अग्निशमन विभागाकडे फायर ऑडिट करण्याकरिता शाळांची यादी दिली होती. मात्र, मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण देत गेल्या दीड वर्षापासून याकडे सर्रासपणे काणाडोळा केला जात आहे. पुढील शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होणार असले, तरी महापालिका प्रशासन शाळांच्या सुरक्षेबाबत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे.
शाळांमध्ये मॉकड्रिल
शाळेत आग लागल्यास विद्यार्थ्यांनी बचावासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचे मॉकड्रिल शाळांमध्ये केले जाते. प्रत्यक्षात महापालिकेसह बहुतांश खासगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणाच नसल्याने, या माॅकड्रिलचे कौतुक कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा :
- नाशिक : अग्निप्रतिबंधात्मक साहित्याची अखेर खरेदी
- नारळाच्या करवंटीपासून सक्रिय कार्बनची निर्मिती
- अहमदनगर : पोलिस पाटील भरती कार्यक्रम लांबणीवर
The post नाशिक : मनपाच्या शाळा 'फायर ऑडिट'विना, विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात appeared first on पुढारी.