मणिपूर घटनेच्या निषेधार्थ नाशिककर रस्त्यावर

मणिपूर,www.pudhari,news

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा

सावित्रीच्या देशात लेकींची विटंबना होत असतांनाच सरकार गप्प का, मन की बात छोडो मणीपूर पे बोलो, मणिपुर घटनेतील नराधमांना फाशी द्या. अशा आशयाच्या फलकांसह मणिपुर येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ नाशिककर रस्त्यावर उतरले. तोंडावर काळीपट्टी बांधत आंदोनलकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवदेनही दिले.

मूकमोर्चात माजी आमदार सुधीर तांबे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, डॉ. डी. एल. कराड, सुषमा पगार, डॉ. हेमलता पाटील, ॲड. तानाजी जायभावे, राजू देसले, शांताराम चव्हाण, मिलींद वाघ, श्यामला चव्हाण, मनोहर आहिरे यांचेसह हजारो नाशिककर उपस्थित होते. मणिपुर येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या आडमुठेपणाच्या धोरणावर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांतर्फे मंगळवारी (दि. २५) दुपारी चार वाजता मूकमोर्चा काढण्यात आला. हातात निषेधाचे फलक घेत आणि तोंडावर काळी पट्टी बांधत विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह अनेक सामाजिक संघटनांच्या हजाराच्यावर नाशिककरांनी मूकमोर्चाला उपस्थिती दर्शविली.

मणिपूर येथे घडलेल्या दोन महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ समाजमध्यामांद्वारे व्हायरल झाला. गेल्या दोन महिण्यापासून मणिपूर येथे हिंसाचार सुरु आहे आणि त्याठिकाणावर राज्य आणि केंद्र सरकारने कोणतीही ठोस भुमिका अद्याप घेतली नाही. राज्य व केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी तसेच आरोपींना फाशीची शिक्षा करण्यासह मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आहेत मागण्या

मणिपूर येथे राष्ट्रपती राजवट लावावी.

बेकायदा असलेली शस्त्रे जप्त करण्यात यावी

तेथील नागरिकांचे समुपदेशन करत शाळा पुर्ववत कराव्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर घटनेची जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा

हेही वाचा :

The post मणिपूर घटनेच्या निषेधार्थ नाशिककर रस्त्यावर appeared first on पुढारी.