नाशिक : महिलेचा अपघाती मृत्यू; सर्वपक्षीयांचा रास्ता रोको

Andolan

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील टाकळी रस्त्यावर अवजड वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करीत उपोषण केले. त्याला सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दिला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.

ता शशिकांत गांगुर्डे (57, रा. दसक गाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून औरंगाबाद रोड ते टाकळी गावमार्गे नाशिक-पुणे रोड अशी दुतर्फा वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अवजड वाहनांचा समावेश आहे. रस्ता अरुंद व वाहने जास्त अशी येथील अवस्था आहे. याविषयी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा वाहतूक शाखेला कळविले होते. येथील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी केली होती. मात्र, वाहतूक शाखेने याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी झालेल्या अपघातात दसक गावातील महिला ठार झाल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन सुरू केले. सहायक पोलिस उपआयुक्त वाहतूक शाखेचे सीताराम गायकवाड यांनी मध्यस्थी केल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पंधरा दिवसांत मागण्यांवर विचार करण्याचेही आश्वासन मिळाले.

याप्रसंगी माजी नगरसेविका सुषमा पगारे, अनिल ताजनपुरे, माजी नगरसेवक शैलेश ढगे, राष्ट्रवादीचे संजय खैरनार, रिपाइं नेते अनिल गांगुर्डे, भाजपचे भास्कर घोडेकर, युगांतरचे अध्यक्ष रवि पगारे, अनिल जोंधळे, कोमल साळवे, प्रमोद पगारे, प्रवीण आंधळे, पँथरचे गणेश साळवे, वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब शिंदे, रिपाइंचे सागर शिरसाठ, प्रकाश पाटील, महेंद्र सूर्यवंशी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महिला आघाडी राज्य अध्यक्षा तारा डोके, संघमित्रा मोरे, रूपाली कोरी, सिद्धार्थ भालेराव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस आयुक्तांना साकडे
विजय-ममता सिग्नल ते टाकळी गावमार्गे होणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे साकडे स्थानिक माजी नगरसेवकांनी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना घातले. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक राहुल दिवे व आशा तडवी यांच्या नेतृत्वाखाली, तर मनसेतर्फे माजी नगरसेविका मेघा साळवे व नितीन साळवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नाईकनवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

The post नाशिक : महिलेचा अपघाती मृत्यू; सर्वपक्षीयांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.