नाशिक : मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दोनदिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे आज औपचारिक उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नगर जिल्ह्यातील लोणी येथे बुधवार (दि. 22) पासून दोनदिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या परिषदेत महसूल व वनविभागाशी संबंधित विषयांवर मंथन होणार असून आज दुपारी 2.30 ला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते परिषदेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच महसूल परिषद होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांचा गड असलेल्या लोणीतील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे ही परिषद होणार आहे. परिषदेत बुधवारी (दि.22) उद्घाटनापूर्वी भूसंपादन, सर्व प्रकारच्या दाखल्यांचे वितरण, ई-ऑफिस तसेच जमाबंदीविषयक कामकाज व डॅशबोर्डबाबत सादरीकरण केले जाणार आहे. दुपारी 2.30 ला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते परिषदेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. परिषदेमध्ये गुरुवारी (दि. 23) पाणंद रस्ते खुले करणे, सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे व शर्तभंग, ई – चावडी, ई – मोजणी, ई – पीक पाहणीबाबत सादरीकरण, वाळू निर्गती प्रस्तावित धोरण, अनधिकृत गौण खनिज वाहतूक याबद्दल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे सादरीकरण करतील. तसेच शेतकर्‍यांकरिताची सलोखा योजना, ई – पंचनामा, गायरान जमिनींवरील अतिक्रमणांबद्दलही या परिषदेत चर्चासत्रे होणार आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल. राज्यस्तरीय परिषदेसाठी सर्व विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त तथा भूमी – अभिलेखाचे संचालक, नोंदणी महानिरीक्षक, सर्व जिल्हाधिकारी, समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महसूल आणि वन विभागाचे सर्व सहसचिव, उपसचिव आणि राज्यातील सर्व अपर जिल्हाधिकारी सहभागी होणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दोनदिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे आज औपचारिक उद्घाटन appeared first on पुढारी.