नाशिक : मुख्यमंत्र्यांची तिसरी फेरी एअरपोर्टला खड्ड्यातूनच का?

KHADDEE www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक तर आपला दररोजचा प्रवास खड्डेयुक्त रस्त्यातून करत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेचा अनुभव खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागील आठवड्यात दोनदा येऊन गेला. मंत्रिमहोदयांना जानोरीच्या नाशिक एअरपोर्ट ते दहावा मैल या पाच किलोमीटर रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांतून प्रवास करावा लागला.

शुक्रवारी, दि.21 मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व अनेक मंत्रिगण नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून, तिसर्‍यांदा त्यांना खड्डयातूनच प्रवास करावा लागणार का? असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. नाशिक एअरपोर्टवर जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते एअरपोर्ट या पाच किलोमीटर रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यातच जानोरी औद्योगिक वसाहतीलगत अवजड वाहनांची वर्दळ असल्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. दहावा मैल चौफुलीवर प्रचंड खड्डे पडले असून, दररोज छोटे-मोठे अपघात होऊन काही जण प्राणासदेखील मुकले आहेत. हा रस्ता अतिमहत्त्वाच्या लोकांना नाशिक शहरात जाण्यासाठीचा हमरस्ता असतानादेखील रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मुख्यमंत्र्यांची तिसरी फेरी एअरपोर्टला खड्ड्यातूनच का? appeared first on पुढारी.