नाशिक : मेहुणे गावात पाणीबाणी, ग्रामपंचायतीवर विकत पाणी देण्याची वेळ

पाणीटंचाई

मालेगाव मध्य (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील मेहुणे गावात एक ते दीड महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना जवळील विहिरींवरून, तसेच मालेगाव शहरातून पाण्याचे जार आणावे लागत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने फिल्टर सुरू केले असून, पाच रुपयांत दहा लिटर पाणी दिले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

मेहुणे गावास ५६ खेडी पाणीपुरवठा ( गिरणा डॅम) योजने अंतर्गत पाणीपुरवठा होता. या योजनेद्वारे गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. नांदगाव शहर व ग्रामीण भाग, मालेगाव तालुक्यातील काही गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, या गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. विहिरी आटल्यामुळे वापरण्याचे पाणी महिलांना दोन ते तीन किलोमीटरवरून पायपीट करून आणावे लागत आहे. पाणीटंचाईचा फटका जनावरांनाही बसला आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नांदगाव ५६ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर वर्षाकाठी किमान चार कोटी ८० लाखांचा निधी खर्च होतो. त्यापैकी सुमारे सव्वादोन कोटींचा खर्च फक्त ५९ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो. उर्वरित दीड कोटीच्या आसपास खर्च स्टेशनवरून सर्वत्र पाणीपुरवठा करणाऱ्या सहा पंपिंग स्टेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या विजेच्या देयकांपोटी होत असतो. परंतु, वितरण व्यवस्था व आवर्तनातील समन्वयाचा अभाव यामुळे पुन्हा एकदा ही योजना विस्कळीत झाली आहे.

ऐन उन्हाळ्याच्या मध्यात पाणी वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्याचा परिणाम मालेगाव तालुक्यातील ३९ गावे व नांदगाव शहरासह तालुक्यातील १८ गावांच्या जनजीवनावर झाला आहे.

५६ खेडी पाणीपुरवठा योजनेचे विद्युत पंप बंद असल्यामुळे गावाला पाणीपुरवठा होत नाही. गावातील पाणीपुरवठा करणारी विहिरीही कोरडीठाक पडली आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पत्र दिले आहे.

– पुष्पाबाई अभिमन देवरे, सरपंच, मेहुणे

दीड महिन्यापासून पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी साठवून ठेवावे लागत आहे. जास्त दिवस साठविलेले पाणी प्यावे लागत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच वापरण्यासाठी पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा. – गोरख व्यवहारे, ग्रामस्थ

हेही वाचा : 

The post नाशिक : मेहुणे गावात पाणीबाणी, ग्रामपंचायतीवर विकत पाणी देण्याची वेळ appeared first on पुढारी.