नाशिक : राष्ट्रवादीतून वाघ यांची हकालपट्टी

बाळासाहेब वाघ www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश करत पक्षाच्या विरोधात काम केल्याने वाघ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

1999 साली वाघ यांनी पोलिस दलातील नोकरीचा राजीनामा देऊन आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमवेत शिवसेनेत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनदेखील त्यांनी कार्यकाळ गाजविला. त्यानंतर पंचायत समिती सदस्य म्हणूनदेखील त्यांनी विजय मिळविला होता. त्यादरम्यानच्या काळात दोन्ही गटांना 6-6 जागा मिळाल्याने सभापतिपदाचा तिढा निर्माण झाला होता. त्यावेळी आ. कोकाटे समर्थकांनी वाजे – सांगळे गटाच्या महिला सदस्याला फोडल्याने बाळासाहेब वाघ पंचायत समितीचे सभापती झाले. सन 2014 साली विधानसभा निवडणुकीच्या वेळी आ. कोकाटे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळीदेखील वाघ कोकाटेंसोबत होते. 2014 च्या निवडणुकीत आमदार कोकाटे यांचा पराभव झाला. राजाभाऊ वाजे यांना जनतेने कौल दिला होता. पुढे जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने वाघांनी पुन्हा बंडाचा झेंडा हाती घेतला होता. जिल्हा परिषदेच्या नांदूरशिंगोटे गटातून उमेदवारी केली, मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले. 2019 च्या निवडणुकीच्या वेळी कोकाटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सिन्नर विधानसभा निवडणूक जिंकली. तालुक्यात आमदार कोकाटे यांच्या रूपाने राष्ट्रवादीची सत्ता व तालुकाध्यक्षपद असतानाही वाघ यांनी घुसमट होत असल्याचे सांगत नाराज होऊन कोकाटे यांच्यासोबतच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. मात्र पक्षाच्या सदस्यत्वाचा अथवा तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नसल्याने मध्यंतरी जिल्हाध्यक्ष आव्हाड यांनी त्यांना राजीनामा द्या अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. मात्र वाघ यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष या नात्याने आव्हाड यांनी त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे.

पक्षांतरापूर्वी चर्चा करायला हवी होती : आव्हाड
दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्याशी चर्चा करणे अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाचा रीतसर राजीनामा देणे आवश्यक होते. परंतु, तसे न करता थेट दुसर्‍या पक्षात प्रवेश करून सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून बाळासाहेब वाघ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : राष्ट्रवादीतून वाघ यांची हकालपट्टी appeared first on पुढारी.