धुळे आणि नंदुरबार लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठीच लढवणार : वसंतराव पुरके

धुळे; पुढारी वृत्तसेवा : लोकसभेसाठी धुळे आणि नंदुरबारच्या दोनही जागा इंडिया आघाडीकडून आग्रहीपणे आपण मागणार आहोत. या जागा आपण जिंकण्यासाठीच लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे लोकसभा पक्ष निरीक्षक तथा राज्याचे माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. धुळे लोकसभेसाठी तीन जण इच्छुक असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

धुळे येथील काँग्रेस भवनात आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत राज्याच्या माजी मंत्री शोभाताई बच्छाव यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे युवराज करनकाळ, धुळ्याचे शामकांत सनेर, अनिल भामरे, नाशिक काँग्रेसचे तुषार शेवाळे, एजाज भाई, माजी आमदार डी. एस अहिरे, तसेच बापू चौरे, रमेश श्रीखंडे, नगरसेवक साबीर खान, इंटक्सचे प्रमोद सिसोदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पक्षाचे निरीक्षक पुरके यांनी धुळे लोकसभेसाठी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील तसेच तुषार शेवाळे आणि शामकांत सनेर हे तीन जण इच्छुक असल्याची माहिती दिली.

धुळ्यात आज झालेल्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली असून इच्छुकांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पक्षांतर सुरू असल्याने या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की काँग्रेसमध्ये देखील गळती होऊ नये, यासाठी प्रयत्न होणार आहे. उमेदवारी जाहीर करत असताना संबंधित उमेदवार हा काँग्रेसमध्येच टिकणार आहे किंवा नाही हे देखील तपासून पाहिले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये इतर पक्षातील लोक प्रीतीमुळे जात नसून ते भीतीमुळे जात आहेत आतापर्यंत १७ हजार लोकांना ईडीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यातील बहुसंख्य नोटीस बजावलेल्या लोकांना पक्षात प्रवेश देखील दिला गेला आहे. भारतीय जनता पार्टी लोकशाही धोक्यात आणण्याचे काम करीत असल्याचा आरोपही पुरके यांनी यावेळी केला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेसमोर ऑनलाइन बोलतात. मात्र पत्रकारांसमोर येऊन खरी माहिती सांगत नाहीत. निवडणुकीमध्ये प्रत्येक वर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा केली गेली. मात्र गेल्या सात वर्षात केंद्राच्या माध्यमातून ४ लाख ४४ हजार ८१३ जणांना नोकरी मिळाली. तर सर्व राज्यांमधून केवळ ९ लाख तरुणांना रोजगार दिला गेला यावरून खोटे आश्वासन स्पष्ट होते. नोकरीच्या नावाखाली आता आऊट सोर्सिंग करून विभागांमधील काम चालवले जाते आहे. मात्र भरती प्रक्रिया करून युवकांना काम दिले गेले पाहिजे. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. बिल्कीसबानो प्रकरणातील आरोपींचा सत्कार करणे तसेच नथुराम गोडसे यांचा उदो उदो करणे ही बाब लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे का, असा प्रश्न देखील पुरके यांनी यावेळी उपस्थित केला.

निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी यापूर्वी पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या समितीच्या माध्यमातून निवड होत होती. पण आता पंतप्रधान, केंद्राच्या मंत्री आणि विरोधी पक्ष नेता अशी समिती करण्याचा घाट घातला गेला. यात दोन सदस्य हे भाजपाच्याच बाजूचे असल्याने निवडणूक आयोग हा पारदर्शक राहू शकतो का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
सध्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. देशात न्यायपालिका देखील सुरक्षित नाही. मणिपुरमध्ये महिलांची धिंड निघते. त्यांच्यावर अत्याचार होतो. तसेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची हत्या होते. देशाचे रक्षण करणारा संबंधित सैनिक हा त्यांच्या परिवाराला संरक्षण देऊ शकला नाही, ही सरकारच्या दृष्टीने शोकांतिका आहे. त्यामुळे जनतेने लोकशाही जगवणाऱ्या पक्षासोबत राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : 

 

 

The post धुळे आणि नंदुरबार लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठीच लढवणार : वसंतराव पुरके appeared first on पुढारी.