धुळे : शिंदखेडा पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ सहायकास बेड्या

लाचखोर

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिरपूर येथे पदोन्नतीने बदली झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडून अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी शिंदखेडा पंचायत समितीच्या कनिष्ठ सहायकाने सहा हजाराची लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे. या लाचखोर कर्मचाऱ्यावर धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.

शिंदखेडा येथील पंचायत समिती अंतर्गत वाघाडी खुर्द येथे ग्रामसेवक या पदावर कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यांची पदोन्नतीने ग्रामविकास अधिकारी या पदावर शिरपूर पंचायत समितीत बदली झाली होती. त्यामुळे त्यांना 18 एप्रिल रोजी कार्यमुक्त देखील केले गेले. मात्र यानंतर तक्रारदार असलेल्या ग्रामविकास अधिकारी यांनी वेळोवेळी अंतिम वेतन प्रमाणपत्र मिळण्यासाठी शिंदखेडा पंचायत समिती येथील कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे यांच्याशी संपर्क केला. या कामासाठी किरण मोरे यांनी तक्रारदार असणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडे या प्रमाणपत्रासाठी 8 हजार रुपये लाचेची मागणी केली. यासाठी गटविकास अधिकारी देवरे यांनी अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी समक्ष बोलावले असून त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून तक्रारदार यांना हे प्रमाणपत्र देण्यात येईल असे देखील मोरे यांनी सांगितल्याची माहिती तक्रारदार यांनी धुळ्याच्या लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दूरध्वनीद्वारे दिली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या घटनेची माहिती देऊन तक्रार नोंदवली.

या तक्रारीची धुळ्याचे उपाधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण आणि पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी पडताळणी केली. यावेळी गटविकास अधिकारी देवरे यांच्यासाठी चार हजार रुपये आणि स्वतःसाठी दोन हजार रुपये अशी 6 हजार रुपयाची रक्कम तडजोडी अंती पंचांसमोर मोरे यांनी मागणी केली. ही लाचेची रक्कम त्यांना धुळे येथे देण्याचे सांगण्यात आले. ही रक्कम स्वीकारण्यासाठी मोरे यांनी धुळ्याच्या दत्त मंदिर चौकात संबंधित तक्रारदाराला बोलावले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक मंजितसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भूषण खलाणेकर आदींनी सापळा रचला. यावेळी मोरे यांना तडजोडीत ठरलेली सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post धुळे : शिंदखेडा पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ सहायकास बेड्या appeared first on पुढारी.