नाशिक : रोज दोन तास मोबाइल, टीव्ही बंद; वटार ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा ग्रामस्थांकडून स्वागत

वटार ग्रामपंचायत www.pudhari.news

नाशिक (सटाणा) : सुरेश बच्छाव
बागलाण तालुक्यातील वटार ग्रामपंचायतीने ठराव करून बुधवार (दि.8)पासून गावात घरोघरी दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मोबाइल व टीव्ही वापरावर बंदी घातली आहे. सरपंचपदी माजी सैनिक मच्छिंद्र खैरनार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले असून, त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या कुटुंबाला 500 रुपये दंडदेखील आकारण्याची तरतूद केली आहे. तरी अंमलबजावणीसाठी ग्रामस्थ व पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

वटार ग्रामपंचायतीने प्रजासत्ताकदिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत गावात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मोबाइल व टीव्हीचा वापर न करण्याबाबतचा ठराव केला. सोबतच दररोज पहाटेदेखील याच पद्धतीने अंमलबजावणी करून पालकांनी मुलांकडून अभ्यास करून घेण्याचे ठरविण्यात आले. यासाठी वॉर्डनिहाय ग्रामपंचायत सदस्य व सेवाभावी युवकांची शहानिशा करण्यासाठी नेमणूकदेखील झाली आहे. नवनिर्वाचित सरपंचपद खैरनार यांनी ग्रामस्थ व तरुणांना आवाहन करून प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वच्छता मोहीम राबविली. शिक्षक व इतर शासकीय कर्मचार्‍यांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. एवढ्यावरच न थांबता प्राथमिक शाळेत दोन सुशिक्षित शिक्षकांची गावाच्या वतीने तात्पुरती नियुक्ती करण्यात आली. स्वतः सरपंच व त्यांचे मित्रमंडळ आणि पालक दर महिन्याला लोकवर्गणी संकलित करून संबंधितांना मानधन अदा करणार आहेत. आगामी वर्षापासून थेट पंधराव्या वित्त आयोगातूनच ही तरतूद केली जाणार आहे.

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग
भावी पिढीच्या सर्वांगीण उत्थानासाठी शैक्षणिक प्रगती अपरिहार्य असून, मोबाइल व टीव्हीच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर दुष्परिणाम होत आहे. पालकांचेही याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेऊन दंडात्मक कारवाईची तरतूद करून ठराविक वेळ घरात मोबाइल व टीव्हीचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी वटार ही तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातीलही पहिलीच ग्रामपंचायत ठरलीय.

मोबाइल व टीव्हीच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर दुष्परिणाम होत आहे.शिवाय यामुळे अभ्यास करणार्‍या शेजारील घरातील होतकरू विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास होतो. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार दररोज सकाळी व सायंकाळी मोबाइल व टीव्हीचा वापर न करण्याचे ठरविले. त्यासाठी ग्रामस्थ व पालकांनीही समर्थन दिले असून, त्यामुळे प्रत्यक्षात दंड आकारण्याची नामुष्कीदेखील येणार नाही, असे चित्र दिसून येते. – मच्छिंद्र खैरनार, सरपंच, वटार.

हेही वाचा:

The post नाशिक : रोज दोन तास मोबाइल, टीव्ही बंद; वटार ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा ग्रामस्थांकडून स्वागत appeared first on पुढारी.