नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
धाराशिव संचलित वसाका व्यवस्थापनाने डिसेंबर 2020 अखेरपर्यंतचे कामगारांचे थकीत देणे त्वरित अदा करण्यासाठी सुमारे 150 कामगारांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडले. यासंदर्भात अध्यक्ष अभिजित पाटील, आ. डॉ. राहुल आहेर, अवसायक राजेंद्र देशमुख यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन अमर पाटील यांनी कामगारांना दिले. थकीत देण्यांमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
वसाकाचे बहुतांशी कामगार सेवानिवृत्त झाले असून, त्यांना धाराशिव व्यवस्थापनाने कोणतीही रक्कम अदा केलेली नाही. तसेच भविष्य निर्वाह निधी व सेवानिवृत्त वेतनही प्रलंबित आहे. तसेच डिसेंबर 21 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना त्यांच्या सेवाकाळातील अंतिम रक्कमही मिळालेली नाही. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवस्थापन प्रत्येक वेळी आश्वासन देऊन कामगारांची बोळवण करते. अनेकदा डॉ. राहुल आहेर यांच्याकडे गार्हाणे मांडूनही उपयोग होत नसल्याने निवृत्त कामगारांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. सन 2020 पर्यंतची थकीत रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा करावी. सेवानिवृत्त कामगारांना त्यांची थकीत सर्व रक्कम त्वरित अदा करावी. गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांचे थकीत वेतन वेळेवर देण्यात यावे आदी मागण्यांसाठी वसाकाच्या कामगार युनियनच्या वतीने व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांची भेट घेण्यात आली. यावेळी युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे यांची मात्र अनुपस्थिती जाणवली. देवरे यांच्या व्यतिरिक्त युनियनचे बहुतांशी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.युनियनचे सरचिटणीस रवि सावकार, विलास सोनवणे, हिरामण बिरारी, सजन रौंदळ यांनी कामगारांच्या वतीने आपले गार्हाणे व्यवस्थापनासमोर मांडले. यावेळी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव, उपाध्यक्ष त्र्यंबक पवार, अरविंद सोनवणे, अशोक देवरे आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा:
- गोवा : … तर फुकटात भाजपप्रवेश : विजय सरदेसाई यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
- गोव्याकडे येणार्या पर्यटकांना रोखण्याचा प्रयत्न : रोहन खंवटे
- पिंपरी : आचारसंहितेमुळे ‘जनसंवाद’ नाही
The post नाशिक : 150 कामगारांवर उपासमारीचे संकट; कारखान्याकडून निव्वळ आश्वासनांवर बोळवण appeared first on पुढारी.