निवृत्तिनाथ रथोत्सवाला लोटला जनसागर

संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा– संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पौषवारीनिमित्त मंगळवारी त्र्यंबकनगरी वारकऱ्यांच्या गर्दीने दुमदुमून गेली होती. खांद्यावर भगव्या पताका, मुखी हरिनामाचा गजर आणि टाळमृदंगाच्या स्वरात वारकऱ्यांनी निवृत्तिनाथाचे दर्शन घेत कृतज्ञता व्यक्त केली. दुपारी चार वाजता काढण्यात आलेल्या रथोत्सवात लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी झाले होते.

संत निवृत्तिनाथांची पालखी चांदीच्या रथातून भगवान त्र्यंबकाराजाच्या मंदिरात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. रथाच्या पुढे वारकरी पताका, विणेकरी, टाळकरी सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी रथमार्गावर सडा-रांगोळ्या काढल्या होत्या. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर रथ आल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी त्र्यंबकराजाच्या भेटीला नेण्यात आली. तेथे वारकऱ्यांनी अभंग सेवा केली. कुशावर्तावर तीर्थ घेतल्यानंतर पालखी मंदिरात परतली. रथोत्सवात विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, प्रसिद्धिप्रमुख अमर ठोंबरे, पालखी सोहळाप्रमुख नारायण महाराज मुठाळ, कांचन जगताप महाराज, अनिल गोसावी आदींसह मानकरी मोहन महाराज बेलापूरकर, बाळासोब देहूकर, जयंत महाराज गोसावी, बाळासाहेब डावरे व लाखो वारकरी सहभागी झाले होते.

The post निवृत्तिनाथ रथोत्सवाला लोटला जनसागर appeared first on पुढारी.