नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा, त्यानंतर शहरभर राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान आणि आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटाच्या संकलनाकरिता सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या धावपळीत महापालिकेच्या आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकाची तयारी रखडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रीत अंदाजपत्रक अडकू नये, यासाठी आता प्रशासनाला सर्वेक्षण संपताच युद्धपातळीवर अंदाजपत्रकाचे सादरीकरण व मंजुरीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता २४७७ कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. प्रशासकीय राजवटीत खर्च कमी झाल्याने मागील मंजूर कामांचे दायित्व अर्थात स्पीलओव्हरमध्ये घट झाली. एरवी डिसेंबरमध्ये प्राप्त महसूल व खर्चाचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध तयार केला जात असतो. यासाठी आयुक्तांनी विभागप्रमुखांकडून जमा-खर्चाचा हिशोब, पुढील वर्षासाठी लागणारा निधी यासंदर्भातील माहिती मागविली होती. त्यात संगणक कोड, ईआरपी बजेट कोड, नवीन लेखाशीर्ष तसेच अनावश्यक लेखाशीर्ष रद्द करणे, महसुली व भांडवली स्वरूपातील ईआरपी तरतूद, विकासकामांच्या याद्या याबाबतची माहिती अपेक्षित होती. यासाठी २० डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र बांधकाम, नगरनियोजन, मिळकत अशा प्रमुख विभागांकडूनच माहिती सादर करण्यास विलंब झाला. त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या तयारीत महापालिकेचे सर्वच प्रमुख अधिकारी व्यस्त झाले. पाठोपाठ शहरात डीप क्लिनिंग स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम अद्यापही सुरू असतानाच मराठा समाजाच्या मागासलेपणाची आकडेवारी गोळा करण्यासाठी सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली. ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. या कामांच्या गर्दीत महापालिकेच्या अंदाजपत्रकाची तयारी मात्र मागे पडली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून अंदाजपत्रकाची जय्यत तयारी प्रशासनाला करावी लागणार आहे.
हेही वाचा
- Nashik | टॉप १०० थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर
- किशोरी पेडणेकर, संदीप राऊत यांची आज पुन्हा ईडी चौकशी
- Jharkhand CM Hemant Soren | ईडी छाप्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन नॉट रिचेबल; BMW कार जप्त, अटकेची शक्यता?
The post पंतप्रधान मोदींचा दौरा, सर्वेक्षणामुळे रखडले मनपाचे अंदाजपत्रक appeared first on पुढारी.