नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वृद्ध पित्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास मदतीसाठी बोलावलेल्या मित्राचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बिटको रुग्णालयात घडली. त्यामुळे वडिलांपाठोपाठ जीवलग मित्राच्या मृत्यूचा धक्का एकाला बसला.
विजय भगवंत जाधव (७३, रा. ययातीनगर, जेलरोड) व अनिस देवीदास नायर (३९, रा. गोसावी मळा, जेलरोड) अशी मृतांची नावे आहेत. विजय जाधव यांना सोमवारी (दि. १५) दुपारच्या सुमारास छातीत दुखत असल्याने त्यांचा मुलगा निहान जाधव यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निहान यांनी मित्र अनिस नायरला मदतीसाठी बोलावले होते. दोघांनी रिक्षातून वडिलांना बिटको रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेल्यानंतर विजय जाधव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांसोबत चर्चा करत असतानाच अनिस यांची तब्येत ढासळली. त्यांना उलटी झाल्याने ते रिक्षात जाऊन बसले. रिक्षात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. पित्यापाठोपाठ मित्राचाही मृत्यू झाल्याने निहानवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
The post पित्यापाठोपाठ जिवलग मित्राचाही मृत्यू appeared first on पुढारी.